१८ टक्के मते घेऊन जिंकले पण ३२ टक्के मते घेऊनही पराभूत; खैरेंच्या जयपराजयाचा लेखाजोखा
By नजीर शेख | Updated: May 4, 2024 15:59 IST2024-05-04T15:59:31+5:302024-05-04T15:59:55+5:30
चारवेळा विजय आणि एकदा पराभव पाहिलेले चंद्रकांत खैरे यावेळी देखील आहेत रणांगणात

१८ टक्के मते घेऊन जिंकले पण ३२ टक्के मते घेऊनही पराभूत; खैरेंच्या जयपराजयाचा लेखाजोखा
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उद्धवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे सध्या सहाव्या वेळी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चारवेळा विजय आणि एकदा पराभव पाहिलेल्या खैरे यांनी एकदा केवळ १८ टक्के मते घेऊन विजय मिळविला आहे तर ३२ टक्के मते घेऊनही त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
आपल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत दिवंगत दिग्गज नेते ए. आर. अंतुले यांना पराभूत केलेले चंद्रकांत खैरे हे चारवेळा खासदार झाले आहेत. २०१९ मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये खैरे यांना ३२.०८ टक्के मते पडली तर त्यांचे विजयी प्रतिस्पर्धी एमआयएमचे इम्तियाज जलिल यांना ३२.४५ टक्के मते मिळाली. खैरे यांचा निसटता पराभव झाला. मात्र २००९ मध्ये खैरे यांना केवळ १८.०५ टक्के मते मिळूनही त्यांचा विजय झाला. त्यावेळी काँग्रेसचे उत्तमसिंग पवार आणि अपक्ष शांतीगिरी महाराज निवडणूक रिंगणात होते. अर्थात २००९ मध्ये मतदानाची टक्केवारी फक्त ५१.५६ इतकीच होती. २००९ पेक्षा २०१९ मध्ये खैरे यांनी १४.४० टक्के मते जास्त घेऊनही ते खासदार होऊ शकले नाहीत. २००४ मध्ये तर खैरे यांनी सुमारे ५२ टक्के इतकी मते घेतली होती. त्यावेळी ते १ लाख २१ हजार ९२३ इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.
खैरेंचा सर्वांत मोठा विजय
चंद्रकांत खैरे यांनी २०१४ मध्ये काँग्रेसचे नितीन पाटील यांच्यावर मिळविलेला विजय त्यांचा सर्वात मोठा विजय आहे. त्यावेळी खैरे यांनी पाटील यांना १ लाख ६२ हजार मतांनी पराभूत केले होते. सर्वाधिक मताधिक्याचा विजय असला तरी टक्केवारीचा विचार करता त्यावेळी खैरे यांना ३२. ७७ टक्के आणि पाटील यांना २२.५८ टक्के मते मिळाली.