...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 23:04 IST2026-01-10T23:03:04+5:302026-01-10T23:04:32+5:30
प्रत्येक निवडणुकीत महाराष्ट्रात बांगलादेशी घुसलेत बोलता, हे तुमच्या अमित शाह यांचे अपयश आहे, तुमचे सरकार आहे ना असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.

...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
छत्रपती संभाजीनगर - अजित पवारांवर जे आरोप केले, त्यासाठी बैलगाडी भरून पुरावे नेले त्या पुराव्याचे काय झाले. आज अजित पवार स्वत:च म्हणतायेत जे माझ्यावर ७० हजार कोटींचे आरोप करत होते त्यांच्यासोबत मी सत्तेत आहे. जर ते पुरावे खोटे असतील तर अजित पवारांची माफी मागा असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला.
छत्रपती संभाजीनगर येथे उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. यात उद्धव ठाकरे म्हणाले की, पैशांचा माज करू नका, ममता बॅनर्जींसारखे आम्हीही रस्त्यावर उतरु. अजित पवार तोंड मोठं करून सांगत आहेत. हे आरोप करत होते ते सत्तेत माझ्यासोबत आहेत. ज्यांनी ७० हजार कोटींचा आरोप केला त्यांच्या मांडीला मांडी लाऊन बसतात कसे? फडणवीस यांनी बैलगाडी भरून पुरावे नेले आता काय करायचे त्या पुराव्याचे? जर कागद खरे असतील तर अजित पवार यांना आरोप सिद्ध होईपर्यंत सोबत घेऊ नका आणि जर खोटे असतील तर अजित पवार यांची माफी मागा अशी मागणी त्यांनी केली.
तसेच प्रत्येक निवडणुकीत महाराष्ट्रात बांगलादेशी घुसलेत बोलता, हे तुमच्या अमित शाह यांचे अपयश आहे. तुमचं सरकार आहे ना? साताऱ्यात ज्या कंपनीत धाड पडली ती कोणाची ते उघड करा.महाराष्ट्र अराजकतेच्या बाजूने जात आहे. मुंबईमध्ये ९२ हजार कोटींची एफडी केल्या. कामे करताना कोणाचेही पैसे न घेता काम केली. आज कर्जबाजारी करून ठेवली कुठून फेडणार हे पैसे? विकास पाहिजे पण नियोजन बद्ध हवा, ठेकेदाराचा विकास नको. कारभार पारदर्शक हवा, भाजपासारखा नको सब कुछ दिखता है तसा नको. त्यामुळे मशाल घेऊन पुढे आलो आहे. पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचा अस्सल भगवा फडकवून दाखवू. तुम्ही एक वचन पूर्ण करा आम्ही तुम्हाला दिलेले वचन पूर्ण करून दाखवू. आता भगवा फडकवण्याची जबाबदारी तुमची असं आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केले.
दरम्यान, जो एक भाजप होता ‘राष्ट्र प्रथम’ मानणारा तो भाजप मेला! आता भ्रष्टाचार प्रथम, गुंड प्रथम, बलात्कारी प्रथम हे आता भाजपचे नवीन घोषवाक्य झालेलं आहे. निष्ठावंतांचे हाल सुरू आहेत, बाहेरून आलेल्या घाण लोकांना आंघोळ घालण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. तुमचे वेगळेपण तुम्ही गमावले आहेत. जाऊ तिथे खाऊ झाले, मुजरा बंद करायला गेले आणि स्वतः मुजरा करून आले. विकासावर बोला म्हणे पाण्याच्या योजना कोणी आणली, गुंठेवारीसारखा प्रश्न सोडवला, रस्ते केले हे कोणी केले. तुम्ही सांगा शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे तुम्ही काय केले? पहिल्यांदा निवडणूक पाहिली की विरोधात कोणी राहू नये म्हणून पैशांचा वापर करून बिनविरोध निवडणूक घेण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.