वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 20:32 IST2025-05-06T20:32:03+5:302025-05-06T20:32:37+5:30
सिल्लोड तालुक्यातील पेंढगाव येथील घटना

वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
श्यामकुमार पुरे, सिल्लोड: तालुक्यात मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी गारींचा पाऊस झाला. त्यात पेंढगाव येथे दुपारी ३.३० वाजता लग्न लागत असतांना अचानक पाऊस आला व वाऱ्यामुळे लग्न मंडप उडल्याने वऱ्हाडी मंडळींची धावपळ झाली. यामुळे शेतात झालेल्या चिखलातून नवदेव-नवरीला खांद्यावर उचलून न्यावे लागले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
तळणी येथील नवरदेव अतुल ठोंबरे व पेंढगाव येथील वधू भाग्यश्री चिकटे यांचा पेंढगाव येथील एका शेतात मंगळवारी दुपारी १२.४५ वाजता विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र वऱ्हाड लग्न मंडपात ३.३० वाजता आले. लग्नाचे अर्धे मंगल अष्टक झाले अन् अचानक वादळी वाऱ्यासह गारिंचा पाऊस झाला. पावसातच लग्न लावण्यात आले, मात्र अचानक लग्नमंडप उडून गेला.
सिल्लोड(छत्रपती संभाजीनगर): वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले pic.twitter.com/4PZ3M1n4SV
— Lokmat (@lokmat) May 6, 2025
त्यानंतर शेतात बाजूला असलेल्या एका खोलीत कसे बसे उर्वरित लग्न लावण्यात आले. त्यानंतर शेतात पावसामुळे चिखल झाला, त्यामुळे नवरदेव व नवरीला बाहेर रस्त्यावर येता येत नव्हते. गावातील काही तरुणांनी नवरदेव व नवरीला खांद्यांवर उचलून चिखलातून मार्ग काढून कसे बसे रस्त्यापर्यंत आणले, त्यानंतर वधू वर वाहनात बसवून तळणी येथे गेले.
शेवटी गावात एका ठिकाणी वऱ्हाडी मंडळीला थांबवून जेवण देण्यात आले. हे लग्न जर वेळेवर लागले असते, तर हा प्रकार झाला नसता. मात्र नवरदेवाकडील काही तळीरामांनी वरातीत नाचण्यासाठी हट्ट धरल्याने वऱ्हाड मंडपात उशिरा आले व त्यामुळे वऱ्हाडी मंडळी व नागरिकांना त्रास सहन करावा लागला, अशी माहिती एका प्रत्यक्ष दर्शीने लोकमतला दिली.