महायुतीचे संकेत तरीही दिवसभर काथ्याकुट; मराठवाड्यातील नेत्यांसोबत महसूलमंत्र्यांची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:55 IST2025-12-27T13:05:35+5:302025-12-27T13:55:06+5:30
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेसेना व भाजपमध्ये अद्याप जागावाटपाबाबत एकमत झालेले नाही.

महायुतीचे संकेत तरीही दिवसभर काथ्याकुट; मराठवाड्यातील नेत्यांसोबत महसूलमंत्र्यांची चर्चा
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड-वाघाळा, लातूर आणि परभणी महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या अनुषंगाने शुक्रवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या-त्या क्षेत्रातील नेत्यांशी चर्चा करून दिवसभर काथ्याकुट केला. जालना महापालिकेत शिंदेसेना-भाजपमध्ये वाद सुरू आहे. परभणीत शिंदेसेनेचे प्राबल्य आहे. लातूर आणि नांदेडमध्ये भाजपची ताकद आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेसेना व भाजपमध्ये अद्याप जागावाटपाबाबत एकमत झालेले नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी चिकलठाणा येथील भाजप पक्ष कार्यालयात शुक्रवारी स्थानिक नेत्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला.
जागा वाटप आणि महायुतीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, भाजप शिंदेसेना युती अंतिम टप्प्यात आहे, शनिवारी रात्रीपर्यंत सर्व निर्णय होतील. मराठवाड्यातील सर्व महापालिकांचा आढावा घेतला. खूप काही अडचणी नाहीत निर्णय होईल. ज्या-ज्या जागेवर भाजपची ताकद किती आहे, ते बघून मागील जागा, सध्याची स्थिती काय आहे, यावर चर्चा केली. संभाजीनगर मनपाबाबत मंत्री सावे यांच्यासह शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतदेखील चर्चा करू आणि अंतिम निर्णय घेऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युतीचे संकेत दिले असून, त्यानुसारच काम सुरू आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये भाजप शिंदेसेना एकत्रित लढणार आहोत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी खोचक उत्तरे दिली.
राष्ट्रवादी काही ठिकाणी सोबत असेल...
राष्ट्रवादी (अजित पवार) काही ठिकाणी भाजपसोबत येत आहे. इतर तीन ते चार ठिकाणीदेखील सोबत असतील. मुंबईतला तिढा सुटलेला आहे, लवकरच तेथील उमेदवार जाहीर होतील. मुंबईत १३ मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू आहे, आरपीआयसह इतर गटांतील पक्षांची चर्चा होत असून, नागपूरला योगेंद्र कवाडे आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. ज्या ठिकाणी आमच्या कोट्यातून शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही जागा सोडू, जिथे शिंदेसेनेतून जागा सुटणे शक्य असेल तेथून सोडू, असे बावनकुळे म्हणाले
मुनंगटीवार नाराज नाहीत..
सुधीर मुनगंटीवार नाराज नाहीत, त्यांच्याबद्दल गैरसमज केले जात आहेत. त्यांच्या व आमच्या मनातही काही नाही. त्यांच्या नेतृत्वात आम्ही विदर्भ आणि चंद्रपूरच्या महानगरपालिका लढत आहोत. काही ठिकाणी प्रवेशामुळे जुने कार्यकर्ते काही प्रमाणात नाराज होतात. भाजपमध्ये कुणीही आले तर त्यांना सामावून घेतो आणि आमचे काम चालू ठेवतो, असे बावनकुळे म्हणाले.