जालन्यात रावसाहेब दानवे, कैलास गोरंट्यालांच्या रणनीतीने भाजप नंबर वन; शिंदेसेना बॅकफूटवर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 18:14 IST2026-01-17T18:05:20+5:302026-01-17T18:14:07+5:30
निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष, काँग्रेसचे केवळ नऊ उमेदवार विजयी, उद्धवसेनेनेसह दोन्ही राष्ट्रवादीचा सुपडासाफ

जालन्यात रावसाहेब दानवे, कैलास गोरंट्यालांच्या रणनीतीने भाजप नंबर वन; शिंदेसेना बॅकफूटवर!
- विजय मुंडे
जालना : महानगरपालिका निर्मितीनंतर प्रथमच झालेल्या जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ४१ जागांवर विजय मिळवित 'किंग' ठरला आहे. भाजपचे नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल हे या निवडणुकीतील धुरंधर ठरले असून, मित्रपक्ष शिंदेसेनेला १२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. महाविकास आघाडीतील केवळ काँग्रेसला नऊ जागांवर विजय मिळविता आला आहे.
जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर आपल्याच पक्षाचा झेंडा रोवण्यासाठी नेतेमंडळींनी साखर पेरणी सुरू केली होती. निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर महायुती, मविआसाठी बैठकांचे फड रंगले. परंतु, महायुतीतील भाजप, शिंदेसेनेने स्वबळावर उमेदवार दिले होते. तर राष्ट्रवादीने (अजित पवार) मनसेसोबत युती करून उमेदवार उभा केले होते. महाविकास आघाडीची मोट या निवडणुकीत कायम राहिली होती. प्रचाराच्या रणधुमाळीत एकमेकांवर टीका न करण्याचा ‘तह’ पाळत प्रचार यंत्रणा राबविण्यात आली. महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत ६१.१६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर शुक्रवारी मतमोजणी सुरू झाली. प्रभागनिहाय येणाऱ्या निकालात भाजपने बहुमताकडे वाटचाल सुरू केली होती. भाजपला बहुमत मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट होताच समर्थकांनी एकच जल्लोष सुरू केला होता. अखेरचा निकाल हाती आल्यानंतर भाजपने ४१ जागांसह बहुमत मिळविले. शिंदेसेनेने १२, काँग्रेसने ९ तर एमआयएमने दोन जागांवर विजय मिळविला. तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या उमेदवारांसह समर्थकांनी संपूर्ण शहरात मोठा जल्लोष केला. या निवडणुकीच्या निकालानंतर माजी मंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे व समर्थकांनी एकत्रित येत जल्लोष केला. भाजपने केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांना मतदारांनी काैल दिल्याचे सांगण्यात आले. यापुढील काळात शहराचा चेहरा-मोहरा बदलणार असल्याची ग्वाही नेतेमंडळींनी दिली. त्यानंतर उमेदवारांनी आपापल्या प्रभागात समर्थकांसह मोठा जल्लोष केला. दरम्यान, ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुषकुमार नोपाणी व इतर प्रशासकीय यंत्रणेने मोठे प्रयत्न केले. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था आबाधित राहिली.