मतदानापासून वंचित राहू नये म्हणून सरकारी नोकरदारांसाठी टपाली मतदानाचा पर्याय
By साहेबराव हिवराळे | Updated: April 30, 2024 13:08 IST2024-04-30T13:07:47+5:302024-04-30T13:08:20+5:30
मराठवाड्यात ३२० बुक, तर ७१७ पोस्टल बॅलेट रवाना

मतदानापासून वंचित राहू नये म्हणून सरकारी नोकरदारांसाठी टपाली मतदानाचा पर्याय
छत्रपती संभाजीनगर : मतदारसंघापासून दूर नाेकरीस असणाऱ्यांना मतदान करणे शक्य होत नाही, अशा मतदारांसाठी मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून मराठवाड्यात जवळपास ३२० बुक (होणाऱ्या मतदानाची नोंदणी), तर ७१७ पोस्टल बॅलेट मतदान शनिवारपर्यंत झाले आहे. ‘मतदान हा तुमचा हक्क आहे, तो तुम्ही बजावलाच पाहिजे’ असा संदेश देऊन शासकीय व शालेय स्तरावर जनजागृती केली जात आहे. कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांंनाही जिल्हा प्रशासनाच्या वतीने पगारी सुटी घोषित करण्यात आली आहे.
सहा एप्रिलपासून ते २७ एप्रिलपर्यंत छत्रपती संभाजीनगर पोस्ट कार्यालयात ३२० ची नोंदणी केली. आतापर्यंतच्या दोन टप्प्यांचे ७१७ पोस्टल मतदान पाठविलेले आहे. अजून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. टपाल विभाग काटेकोरपणे गोपनीयता पाळत आहे. त्या मतपत्रिकांच्या आसपास कुणालाही फिरकूसुद्धा दिले जात नाही.
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) ४३, बीड १४, जळगाव २७, नांदेड ११५, उस्मानाबाद ११७, परभणी ४ अशा नोंदणी आहेत. पोस्टल मतदान झालेले विभाग असे : नांदेड २९६, परभणी व हिंगोली एमडीजी २३५, परभणी एचओ १८६, असे एकूण ७१७ मतदान बॅलेटद्वारे डिलिव्हर झाल्याचे पोस्टाच्या आकडेवारीत निदर्शनास येत आहे.
टपाली मतदान वाढेल
औरंगाबादचे मतदान १३ मे रोजी असून, येथील मतदार अनेक जण परराज्यात नोकरीस आहेत. येणाऱ्या काळात टपाली मतदानाचा हा आकडा वाढेल.
- असदउल्लाह शेख, सहायक निदेशक, डाक विभाग क्षेत्रीय कार्यालय