'फक्त भुमरे मामा'; औरंगाबादमध्ये संदीपान भुमरे विजयी, जलील दुसऱ्या तर खैरे तिसऱ्या स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 21:28 IST2024-06-04T21:27:43+5:302024-06-04T21:28:01+5:30
Aurangabad Lok Sabha Result 2024: महायुतीची जागा खेचून आणली: संदीपान भुमरे

'फक्त भुमरे मामा'; औरंगाबादमध्ये संदीपान भुमरे विजयी, जलील दुसऱ्या तर खैरे तिसऱ्या स्थानी
Aurangabad Lok Sabha Result 2024: छत्रपती संभाजीनगर : महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी औरंगाबाद लोकसभेत विजय निश्चित केला आहे. २५ व्या फेरी अखेर भुमरे यांना ४ लाख ६८ हजार १३८ मते मिळाली. तर एमआयएमचे इम्तीयाज जलील यांना ३ लाख ३७ हजार ६ मते, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना २ लाख ८६ हजार २४४ मते मिळाली आहेत. भुमरे हे जलील यांच्या पेक्षा १ लाख ३१ हजार १३२ मतांनी तर खैरे यांच्या पेक्षा १ लाख ८१ हजार ८९४ मतांनी पुढे आहेत.
खैरे पर्व संपले...
मी पहिल्यापासून सांगत होतो, विकासावर बोला. खैरे यांना अनेकदा सांगितले वैयक्तिक बोलू नका. खरे गद्दार हे खैरे आहेत, त्यांनी मशाल घेतली. इतक्या दिवस धनुष्यबाण धनुष्यबाण करीत होते. खैरे पर्व संपले आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला पहिले प्राधान्य असेल. दुसरे प्राधान्य वीज, रस्ते, ग्रामीण भागातील प्रश्नांना प्राधान्य असेल. चंद्रकांत खैरे म्हणजे बालिश माणूस आहे. नको ते बोलत असतात. खैरे हा विषय राजकारणातून आज संपला, आज त्यांचा कडेलोट झाला आहे. २०१९ मध्ये गेलेली शिवसेनेची जागा पुन्हा घेतली आहे. खैरे ३ नंबरला गेले, मला गद्दार म्हटले, पण मी मतपेटीतून दाखवून दिले. आता खैरे यांनी शब्द पाळावा, हिमालयात जावे. २४ तास होमहवन नसते, खैरे यांनी वैयक्तिक वल्गना केल्या. हे मतदारांमुळे घडून आले आहे, अशी प्रतिक्रिया संदीपान भुमरे यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली.