'ना अपक्ष, ना कोणाला पाठिंबा'; औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून विनोद पाटील यांची माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 05:54 PM2024-04-24T17:54:36+5:302024-04-24T17:59:39+5:30

मराठा आरक्षण याचिकाकर्ता विनोद पाटील यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

'Neither independent, nor supporting anyone'; Vinod Patil's withdrawal from Aurangabad Lok Sabha elections | 'ना अपक्ष, ना कोणाला पाठिंबा'; औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून विनोद पाटील यांची माघार

'ना अपक्ष, ना कोणाला पाठिंबा'; औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून विनोद पाटील यांची माघार

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण याचिकाकर्ता विनोद पाटील यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे आज जाहीर केले. आज दुपारी समर्थकांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली. तसेच निवडणुकीत कोणत्याही उमेदवारास पाठिंबा देणार नसून तटस्थ राहणार असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणूक जाहीर होताच विनोद पाटील यांनी औरंगाबाद लोकसभेतून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. महायुतीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. मात्र, भाजप आणि शिंदेसेनात औरंगाबादची जागा प्रतिष्ठेचा मुद्दा झाला. अखेर शिंदेसेनेला जागा सुटून महायुतीकडून पालकमंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतरही विनोद पाटील निवडणूक लढणार यावर ठाम होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी नागपूर येथे जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी देखील त्यांनी निवडणूक लढणारच याचा पुनरुच्चार केला होता. त्याच दिवशी अचानक संदीपान भूमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

दरम्यान, मी छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवावी अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. मी निवडणूक लढवली पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण शहरातील सत्ताधारी दोन आमदार आणि एक खासदाराने मला उमेदवारी देऊ नयेत, यासाठी टोकाचा विरोध केला, असा आरोप विनोद पाटील यांनी केला. तसेच उदय सामंत यांनी देखील भेटू घेऊन, तुम्ही आता थांबा, अशी विनंती केली. विजयाचे गणित माझ्याकडे असल्याचे सांगिताच सामंत यांनी ते माझ्या हातात नाही असे म्हंटले. त्यानंतर आज समर्थकांची बैठक घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर लोकसभा लढवली पाहिजे असा आग्रह शहरवासीयांनी धरला होता. त्यामुळे निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती, असेही पाटील म्हणाले.

अपक्ष निवडणूक लढली तरी विजय...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून महायुतीकडून निवडणूक लढवण्यास सांगितले. कालही मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत माझं बोलणं झालं. मागील दोन तीन दिवसांत मी नागरिकांशी चर्चा केली. मी अपक्ष निवडणूक लढवल्यास मी निवडून येऊ शकतो, पण निवडून आलो नाही तर कुणाला तरी पाडण्यासाठी उभा होता हा डाग मला लावून घ्यायचा नाही. मी कुणाला फायदा व्हावा यासाठी माघार घेत नाही. उद्यापासून लोकांची भेट घेणार आहे. त्यांचे प्रश्न सोडवणार आहे. मी नाक रगडून लोकांची माफी मागतो, मी सार्थ ठरलो नाही, असेही ते म्हणाले.  ज्यांची घर काचेची असतात त्यांनी लोकांच्या घरावर दगड मारू नयेत, असा इशाराही त्यांनी दिला. 

Web Title: 'Neither independent, nor supporting anyone'; Vinod Patil's withdrawal from Aurangabad Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.