इत्तेहादमुळे मुस्लीम नेतृत्व जन्माला आले, तेसुद्धा आपल्यातील काहींनी संपविले: अकबरोद्दीन ओवैसी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 18:46 IST2026-01-12T18:44:10+5:302026-01-12T18:46:27+5:30
रुसवेफुगवे सारून एकत्र या. आपल्यातील एकजण महापौर झाला तर तुम्हाला आनंद होणार नाही का?

इत्तेहादमुळे मुस्लीम नेतृत्व जन्माला आले, तेसुद्धा आपल्यातील काहींनी संपविले: अकबरोद्दीन ओवैसी
छत्रपती संभाजीनगर : इत्तेहादमुळे या शहरात २०१४ नंतर मुस्लीम नेतृत्वाने जन्म घेतला. अवघ्या दहा वर्षांतच या नेतृत्वाला संपविण्याचे काम आपल्यातील काही मंडळींनी केले. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आपसांतील मतभेद बाजूला ठेवा, तिकीट मिळाले नाही, म्हणून रुसवेफुगवे सारून एकत्र या. आपल्यातील एकजण महापौर झाला तर तुम्हाला आनंद होणार नाही का? असा सवाल रविवारी आमखास मैदानातील जाहीर सभेत एमआयएम पक्षाचे नेते अकबरोद्दीन ओवैसी यांनी केला.
शहराचे नाव बदलणारे महापालिकेच्या सत्तेत येतील, असा इशाराही त्यांनी दिला. आवैसी यांनी नऊ वाजता आपल्या भाषणाला सुरुवात केली. सुमारे एक तास त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. अत्यंत आक्रमकपणे त्यांनी आपले मुद्दे मांडले. कुडकुडणाऱ्या थंडीतही त्यांना ऐकण्यासाठी तरुणाईने मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तरुणाईत जोश भरण्याची कोणतीही कसर त्यांनी सोडली नाही. एमआयएम पक्ष कशा पद्धतीने काम करीत आहे, स्वत:चे दवाखाने, बँकांच्या माध्यमातून कशी मदत केली जात आहे, त्याचा तपशील ओवैसी यांनी दिला.
देश स्वतंत्र झाला तेव्हा नेहरू पंतप्रधान झाले. तेव्हापासून मनमोहनसिंग यांच्यापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांना देशातील अल्पसंख्याक बांधवांनी मदत केली. या बदल्यात मुस्लीम समाजाला काय मिळाले? अनेक क्षेत्रांत आजही मुस्लीम समाज मागेच आहे. २०१४ नंतर मुस्लिमांवर अन्याय, अत्याचार आणखी वाढत गेला. याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली. पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीकेची झोड उठवत नमूद केले की, सत्तेवर येण्यापूर्वी १५ लाख रुपये प्रत्येक नागरिकाच्या खात्यात टाकण्याचे आश्वासन दिले. डॉलरचे दर कमी करणार अशी किती तरी आश्वासने दिली होती. ‘भ्रष्टाचार थांबविणार’ असे सांगितले होते. इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमाने त्यांनी स्वत:च भ्रष्टाचार केला. आज डॉलर ९० रुपये २१ पैसे झाले तरी ते एक शब्द बोलत नाहीत. विदेशी गुंतवणूक घटली तरी बोलत नाहीत, असेही ते म्हणाले. आवैसी यांच्यापूर्वी एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी भाषण केले.