"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 20:35 IST2025-12-30T20:35:24+5:302025-12-30T20:35:58+5:30
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election 2026: राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) बाजूला ठेवून शिंदेसेना आणि भाजपाने युतीसाठी वाटाघाटी सुरू केल्या होत्या. पण, अखेरच्या दिवशी युती तुटली.

"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
"भाजपाच्या अहंकारामुळे युती तुटली आहे", असे सांगत शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. शिंदेसेनेकडून भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर युती तुटल्याचे खापर फोडण्यात आले. पण, आता भाजपाने नेत्यांनी शिंदेसेनेनेच युती तोडली असल्याचा आरोप केला आहे. भाजपाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी भाजपा आणि शिंदेसेनेमध्ये ठरलेल्या जागावाटपाचा आकडाही सांगून टाकला.
राज्यात एकत्र असलेल्या भाजपा-शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात महापालिका निवडणुकीमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे. भाजपाने जवळपास बहुतांश ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवले आहे. तर शिंदेसेनेला सोबत घेतले. मात्र, महत्त्वाच्या महापालिकांमध्ये शिंदेसेना आणि भाजपाचा खेळ बिघडला आहे. पुण्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये युती तुटली.
आम्ही दहा दिवसांपासून प्रयत्न करत होतो
"छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आमचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, जी महायुती इथे होती, ती तुटली आहे. आम्ही तर मागील दहा दिवसांपासून महायुती कशी होईल आणि सगळ्या पक्षांना न्याय कसा मिळेल, याचाच प्रयत्न करत होतो."
भाजपाने शिंदेसेनेला किती जागा दिलेल्या?
"शिवसेनेने ही महायुती तोडली आहे. त्यांनीच याची घोषणा केली आहे. आमची जी शेवटची बैठक झाली होती, त्यात जे ठरले होते, ते असे की, ५० जागा भाजपा लढणार आणि ३७ जागा शिवसेना लढेल", अशी माहिती भागवत कराड यांनी दिली.
"आमची ५० जागांवर तयारी तर आहे. पण ३७ जागा ज्या ठिकाणी शिवसेना लढणार होती. तिथेही आम्ही आता सगळे मिळून निर्णय घेऊ. आम्ही जे काम केले आहे, त्यावरून आम्हाला पूर्ण विश्वास आहे की मतदार आमच्यासोबत राहतील. आम्हाला निवडून देतील", असा दावा कराड यांनी युती तुटल्यानंतर माध्यमांशी बोलताना केला.
संजय शिरसाट भाजपाबद्दल काय म्हणाले?
"युतीसाठी मी प्रयत्न करत होतो. पण, भाजपाकडून शिवसेनेला अंधारात ठेवण्यात आले. युतीसाठी दहा बैठका झाल्या. ऐनवेळी स्थानिक भाजपा नेत्यांनी मेख मारली. शिवसेना नेते, कार्यकर्ते यांच्या अस्वस्थता निर्माण होईल, असा नवीन प्रस्ताव भाजपाने ऐनवेळी दिला. त्यामुळे ही युती तुटली", असे संजय शिरसाट भाजपावर आरोप करताना म्हणाले.
"आमची ताकद वाढली, आता आम्ही काहीही करू शकतो, हा जो भाजपा नेत्यांना अहंकार आहे, त्या अहंकारामुळे आज शिवसेना-भाजपा युती तुटली आहे. स्थानिक भाजपा नेत्यांनी जाणीवपूर्वक युती तोडलेली आहे", असेही शिरसाट म्हणाले होते.