छ. संभाजीनगरात आघाडीत काँग्रेसचे खा. काळे अडसर: 'वंचित'; चर्चा सकारात्मक, काळेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 18:29 IST2025-12-25T18:27:04+5:302025-12-25T18:29:08+5:30
महाविकास आघाडी म्हणून लढण्यासाठी ठाकरेसेनेचा अजिबात प्रतिसाद नसल्याचे समोर आले आहे.

छ. संभाजीनगरात आघाडीत काँग्रेसचे खा. काळे अडसर: 'वंचित'; चर्चा सकारात्मक, काळेंचा दावा
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) व वंचित बहुजन आघाडी यांची सकारात्मक चर्चा सुरू असून, लवकरच अंतिम निर्णय होईल, असे काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी सांगितले. तर डाॅ. कल्याण काळे हेच या आघाडीत अडसर ठरत असून, त्यांना ‘वंचित’बरोबर आघाडी होऊ नये असे वाटत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा निरीक्षक योगेश बन यांनी केला आहे. महाविकास आघाडी म्हणून लढण्यासाठी ठाकरेसेनेचा अजिबात प्रतिसाद नसल्याचे समोर आले आहे.
डॉ. काळे म्हणाले, या तीन पक्षांत समन्वय होऊन जागावाटप होईल, असा विश्वास आम्हाला वाटतो.काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची मुंबईत गुरुवारी (दि. २५) बैठक होत आहे. त्यामुळे मी मुंबईकडे रवाना होत असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसूफ म्हणाले, आघाडी व्हावी यासाठी आमच्या स्थानिक पातळीवर बैठकांचे सत्र सुरूच आहे. लवकरच अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
राष्ट्रवादीचे (शरद पवार) शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांनी सांगितले की, आम्हाला ३० जागा मिळाव्यात असा आग्रह आहे. त्यात आम्ही गंगाधर गाडे यांच्या पँथर्स रिपब्लिकन पार्टीलाही सामावून घेणार आहोत. काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व आमची बोलणी सुरू आहे. ठाकरेसेनेकडून मात्र अजिबात प्रतिसाद नाही. छत्रपती संभाजीनगरसाठी पक्षाने बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. दि. २५ डिसेंबर रोजी ते शहरात दाखल होत आहेत. ते आल्यानंतर चर्चेला गती येईल, असे ख्वाजाभाईं यांनी सांगितले.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा निरीक्षक योगेश बन यांनी स्पष्ट आरोप केला की, काँग्रेसअंतर्गत एकमत नाही. खा. डॉ. कल्याण काळे हे आघाडीच्या मन:स्थितीत दिसत नाहीत. म्हणून आमची स्वत: लढण्याची तयारी सुरू आहे.
भाजप व मनसेव्यतिरिक्त शिंदेसेना किंवा उद्धवसेनेसाठी युती करण्यासाठी आता आमचे दरवाजे खुले असल्याचे बन यांनी जाहीर केले.
यासंदर्भात बोलताना शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख युसुफ यांनी सांगितले की, ठाकरेसेनेशी आम्ही चार वेळा चर्चा केली. त्यावेळी नामदेव पवार, प्रकाश मुगिदया, विलास औताडे, जगन्नाथ काळे व रवी काळे यांची काँग्रेसतर्फे उपस्थिती होती. तर वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करताना माझ्यासमवेत एम.एम. शेख, कमाल फारुकी, इब्राहिम पठाण, डॉ. जफर खान, डॉ. सरताज पठाण व ॲड. सय्यद अक्रम यांचा समावेश होता. जागांवर अद्याप एकमत झाले नाही.