"छत्रपती संभाजीनगरात काँग्रेसने 'वंचित'ला साथ दिली असती तर मोठे यश मिळाले असते"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 12:16 IST2026-01-17T12:15:57+5:302026-01-17T12:16:56+5:30
"खासदार कल्याण काळेंच्या अहंकारामुळे काँग्रेसची धूळधाण! ‘वंचित’चे जिल्हा निरीक्षक योगेश बन

"छत्रपती संभाजीनगरात काँग्रेसने 'वंचित'ला साथ दिली असती तर मोठे यश मिळाले असते"
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निकालात वंचित बहुजन आघाडीने आपली ताकद दाखवून दिली आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये वंचितच्या संपूर्ण पॅनलने विजय मिळवत विरोधकांना धक्का दिला आहे. या विजयानंतर वंचितचे जिल्हा निरीक्षक योगेश बन यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. "काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या अहंकारामुळे ही निवडणूक काँग्रेसच्या हातातून गेली," असे खळबळजनक विधान त्यांनी यावेळी केले.
काँग्रेसपेक्षा 'वंचित' मोठी!
या निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या १ जागेवर समाधान मानावे लागले आहे, तर वंचित बहुजन आघाडीने ४ जागा जिंकत काँग्रेसला पिछाडीवर टाकले आहे. योगेश बन म्हणाले की, "जर काँग्रेस आणि वंचितची युती झाली असती, तर शहरात आमचे किमान ४० उमेदवार निवडून आले असते. मात्र, खासदारांच्या अहंकारामुळे महाविकास आघाडीला फटका बसला." १४ ते १५ जागांवर वंचितचे उमेदवार थोड्या मतांनी पराभूत होऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
भाजप आणि पैशाच्या वापरावर टीका
निकालावर बोलताना बन यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. "भाजपने संपूर्ण मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता. त्यामुळेच त्यांचे अपेक्षेपेक्षा जास्त उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत जो पैशाचा पाऊस पडला, तिथे आमची गरीब वंचित आघाडी पडली. आम्हाला १९ जागांची अपेक्षा होती, पण पैशाच्या जोरावर लोकशाहीचा गळा आवळला गेला," असे ते म्हणाले.
प्रभाग ३ मध्ये निर्विवाद वर्चस्व
शहरात कुठेही लाट असली तरी प्रभाग ३ मधील मतदारांनी वंचितच्या संपूर्ण पॅनलला निवडून देऊन पक्षावरील विश्वास कायम ठेवला आहे. "आम्ही या निकालाने पूर्णपणे समाधानी नाही, पण भविष्यात अधिक जोमाने काम करून जनतेचे प्रश्न मांडत राहू," असा निर्धार वंचितच्या वतीने व्यक्त करण्यात आला.