'मी आत्महत्या करतोय, आता तरी शासनाने डोळे उघडावे', मराठा आरक्षणासाठी टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 13:38 IST2025-02-02T13:38:04+5:302025-02-02T13:38:25+5:30

सिल्लोड तालुक्यातील खुपटा येथील घटना; शेततळ्यात उडी मारुन शेतकऱ्याने संपवले आयुष्य

'I am committing suicide, the government should open its eyes now', one commits suicide for Maratha reservation | 'मी आत्महत्या करतोय, आता तरी शासनाने डोळे उघडावे', मराठा आरक्षणासाठी टोकाचं पाऊल

'मी आत्महत्या करतोय, आता तरी शासनाने डोळे उघडावे', मराठा आरक्षणासाठी टोकाचं पाऊल

श्यामकुमार पुरे, सिल्लोड : तालुक्यातील खुपटा येथे एका ३८ वर्षाय इसमाने नापिकी, कर्जबाजारीपणा व मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या कारणाने खुपटा येथील स्वतः च्या शेतात असलेल्या शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी दुपारी १२ वाजता उघडकीस आली आहे. त्याने शनिवारी रात्री आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

मराठा समाजाला शासन झुलवत आहे
आम्ही अनेक आंदोलने केली, मात्र शासनाने आरक्षण दिले नाही. आता मी आत्महत्या  करत आहे, शासनाने आता  तरी डोळे उघडावे व गरजवंत मराठा समाजाला शासनाने आरक्षण द्यावे, अशी चिठ्ठी लिहून त्याने आत्महत्या केली. समाधान रायभान काळे (वय ३८ वर्षे रा. खुपटा) असे आहे मयत इसमाचे नाव आहे.

समाधान काळे हा त्यांच्या घरातून कोणालाही काही एक न सांगता १ फेब्रुवारी रोजी रात्री १ वाजता घरातून निघून गेला होता. त्यानंतर त्यांचे प्रेत रविवारी त्यांचे स्वतःचे शेतातील शेततळ्यात मिळून आले. त्यांना अग्निशामक दलाच्या सहाय्याने शेततळ्यातून रविवारी दुपारी बाहेर काढून अजिंठा ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले. माहिती मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे, फौजदार गणेश काळे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

आत्महत्येपूर्ली लिहिली चिठ्ठी

काळे यांच्या खिशात एक हस्तलिखित वहीचे कागदावर पाण्यात भिजलेली चिट्ठी मिळाली .चिट्ठी उघडताना खराब झाल्याने त्यामधील काही मजकूर खराब झाला आहे. त्यात लिहिले आहे की, मी रायभान काळे (खुपटा). नापिकी आणि शेकडो मोर्च आंदोलने झाली, तरीसुद्धा मराठा समाजाला  आरक्षण मिळाले नाही. सरकार मराठा समाजाची  फसवणूक  करत आहे. या सर्व गोष्टींना कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. या आत्महत्याने तरी सरकारने डोळे उघडावे. गरजवंत मराठा समाजाला आता तरी शासनाने आरक्षण  द्यावे, असे त्यात लिहिले आहे.

Web Title: 'I am committing suicide, the government should open its eyes now', one commits suicide for Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.