भाजपचे मंत्री अतुल सावे यांची उमेदवारीची हॅट्ट्रिक; कॉँग्रेस, एमआयएमसोबत होणार सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 18:22 IST2024-10-21T18:05:54+5:302024-10-21T18:22:14+5:30
औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून भाजपचे अतुल सावे तिसऱ्यांदा निवडणूक मैदानात

भाजपचे मंत्री अतुल सावे यांची उमेदवारीची हॅट्ट्रिक; कॉँग्रेस, एमआयएमसोबत होणार सामना
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार तथा गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारीची हॅट्ट्रिक त्यांनी साधली आहे.
२०१४ साली पहिल्यांदाच त्यांनी भाजपच्या तिकिटावर औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यात थोड्या मतांच्या फरकाने विजयी झाले. २०१९ साली निवडणुकीच्या तीन महिन्यांपूर्वी त्यांना उद्योग राज्यमंत्रिपदी संधी देण्यात आली. या काळात शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी त्या तीन महिन्यांत प्रयत्न केल्यामुळे योजना मंजूर झाली. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम आणि भाजप आमने-सामने लढले. त्या निवडणुकीतही सावे यांनी बाजी मारली. आता तिसऱ्यांदा ते निवडणूक मैदानात असून त्यांचा सामना काँग्रेस, एमआयएम या उमेदवारांशी होणार आहे.
भाजपने उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर पहिल्या यादीत सावे यांचे नाव होते. पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केल्यावर मतदारसंघातील संपर्क कार्यालयांवर जल्लोष साजरा करण्यात आला. पूर्व मतदारसंघातील गारखेडा, सिडको, कैलासनगर भागात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी फटाके, ढोल-ताशा वाजवत नागरिक, तसेच कार्यकर्त्यांनी मंत्री, तसेच महायुतीचे उमेदवार सावे यांचे स्वागत करत अभिनंदन केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची, तसेच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.