पैठणमध्ये गोदावरीच्या पात्रात अंघोळीसाठी गेलेले 4 बालवारकरी बुडाले, दोघांचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 22:18 IST2025-03-20T22:17:50+5:302025-03-20T22:18:14+5:30
दोन्ही बालके पैठण शहरातील मठात वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत होते.

पैठणमध्ये गोदावरीच्या पात्रात अंघोळीसाठी गेलेले 4 बालवारकरी बुडाले, दोघांचा दुर्दैवी मृत्यू
पैठण- पैठण शहरातील रंगारहाटी परिसरातील मठात वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणाऱ्या दोन बालवारकऱ्यांचा गुरुवारी(20 मार्च) गोदावरी पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मठातील चार बालवारकरी दुपारी स्नानासाठी गोदा पात्रात गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही बुडाले. प्रसंगावधान साधून इतर वारकऱ्यांनी दोघांना वाचवले.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत चैत्यन अंकुश बदर (वय १३) आणि भोलेनाथ कैलास पवळे (वय १०) या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अंकुश (रा. वालसा खालसा तालुका भोकरदन जि. जालना) याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे. तर दुसरा बालवारकरी भोलेनाथ कैलास पवळे (रा . चितेगाव पैठण) याचा शोध घेतल्या जात आहे.
अंधारामुळे शोद मोहिम थांबवली असून, कैलासचा मृतदेह उद्या सकाळी काढला जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दशरथ बुरकुल हे करत आहेत.