धक्कादायक: अनुदान विभागातील कर्मचाऱ्याने नुकसान भरपाईचे पैसे स्व:ताच्या वडिलांच्या नावावर वळवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 15:28 IST2019-12-22T15:19:14+5:302019-12-22T15:28:14+5:30
पैठण तालुक्यातसुद्धा तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांनी गावा-गावात जाऊन पंचनामे करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला होता.

धक्कादायक: अनुदान विभागातील कर्मचाऱ्याने नुकसान भरपाईचे पैसे स्व:ताच्या वडिलांच्या नावावर वळवले
औरंगाबाद: ऑक्टोबर मध्ये झालेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेत सरकारकडून खरीप पिके व फळबाग यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात आली आहे. मात्र पैठणमध्ये तहसील कार्यालयात अनुदान विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने चक्क नुकसान भरपाईच्या यादीत स्वता:च्या वडिलांचे नाव टाकून अनुदानाची रक्कम वळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे महसूल खात्यात खळबळ उडाली आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने सरकराने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पैठण तालुक्यातसुद्धा तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांनी गावा-गावात जाऊन पंचनामे करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला होता. मात्र याच कार्यालयात खाजगी कंपनीमार्फत काम करणाऱ्या प्रदीप नेहाले याने यादीत फेरफार करीत लाभार्थींना डावलून इतर लोकांच्या नावाने अनुदान वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे नेहाले याने स्वता:च्या नातेवाईक आणि वडिलांच्या नावाने सुद्धा अनुदान लाटले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. थेरगाव येथे नेहाले याची वडिलांच्या नावे 1 हेक्टर 65 आर जमीन असून त्यापैकी 0.60 क्षेत्रावर मोसंबीची लागवड असल्याचा अहवाल तलाठी यांच्याकडून देण्यात आला होता. मात्र त्याने यादीत फेरफार करून स्वता:च्या वडिलांच्या नावे 1 हेक्टरवर मोसंबीच पिक लावले असल्याचे दाखवून 18000 रुपयाचे अनुदान लाटले असल्याचा आरोप शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केला आहे.
सखोल चौकशी करण्याची मागणी
शेतकरी आधीच संकटात असताना त्याच्या हक्काच्या अनुदानावर सुद्धा शासकीय कार्यालयात काम करणारे कर्मचारी डल्ला मारत आहे. विशेष म्हणजे प्रदीप नेहाले याने तालुक्यातील अनेक बोगस शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान टाकून त्यांच्याकडून पैसे घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. - जयाजी सूर्यवंशी ( शेतकरी नेते )