मराठवाड्यात प्रचाराकडे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या 'स्टार' नेत्यांचे दुर्लक्ष; हर्षवर्धन सपकाळांची धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 19:47 IST2025-11-27T19:46:38+5:302025-11-27T19:47:22+5:30
राज्यातील सत्तारूढ पक्षातील भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अप) यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

मराठवाड्यात प्रचाराकडे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या 'स्टार' नेत्यांचे दुर्लक्ष; हर्षवर्धन सपकाळांची धावपळ
छत्रपती संभाजीनगर : नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी मराठवाड्यात विविध पक्षांच्या नेत्यांनी सभा आणि बैठकांचा धुरळा उडवला असताना काँग्रेस पक्षात मात्र थंड वातावरण दिसत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ वगळता अन्य एकही बडा नेता मराठवाड्यात सभांसाठी आलेला नाही.
राज्यातील सत्तारूढ पक्षातील भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अप) यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपने तर मराठवाड्यातील प्रत्येक नगर परिषद आणि नगरपंचायत पिंजून काढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर नेते प्रचारात गुंतले आहेत. शिंदेसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मराठवाड्यात सभा घेतल्या. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मराठवाड्यात प्रचाराचा आणि वादग्रस्त विधानांचा धडाका लावला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा प्रचार पिछाडीवर पडला आहे.
काँग्रेस पक्षाने राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी सुमारे ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. मात्र, ही यादी कागदावरच राहिल्याचे दिसते. राज्यात काँग्रेस पक्षातील नेते मात्र प्रचाराच्या बाबतीत फारसे सक्रिय नाहीत, असे चित्र आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज पाटील, मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड, आरेफ नसीम खान ही मंडळी मराठवाड्यात पक्षाच्या प्रचारासाठी मराठवाड्यात आलेली नाहीत. पक्षाचे स्टार प्रचारक असलेले लातूरचे आमदार अमित देशमुख यांनीही लातूर सोडून इतरत्र लक्ष घातलेले नाही. नाही म्हणायला त्यांनी लातूरला एक पत्रकार परिषद घेतली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मात्र काँग्रेसच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या उमेदवारांसाठी धावताना दिसत आहेत.
सपकाळ यांच्या मराठवाड्यातील सभा:
हिंगोली : वसमत
नांदेड : किनवट, भोकर, हिमायतनगर, देगलूर
जालना : भोकरदन
बीड : बीड शहर, परळी
राष्ट्रवादी (श.प.) ची हीच अवस्था
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची देखील अशीच अवस्था आहे. या पक्षाचे ना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे फिरकले ना जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्या सारखे बडे नेते.
नांदेडमध्ये आ. प्रताप पाटील चिखलीकर, तर बीडमध्ये आ. संदीप क्षीरसागर पक्षाची बाजू सांभाळत आहेत.
१८ टक्के पालिकांकडे दुर्लक्ष
२ डिसेंबर रोजी मतदान होणाऱ्या राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींपैकी मराठवाड्यात ५२ नगरपालिका आणि नगरपंचायती आहेत. याचा अर्थ राज्यातील एकूण पालिकांपैकी मराठवाड्यातील १८ टक्के नगर परिषदा आणि नगरपंचायतींत निवडणूक होत आहे. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या नगर परिषदांकडे काँग्रेसने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. निवडणुकीचा प्रचार संपायला केवळ चार दिवस बाकी राहिले असताना सपकाळ वगळता धाराशिव, परभणी, लातूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात काँग्रेसच्या बड्या नेत्याची अद्याप एकही सभा झालेली नाही.