सगेसोयरे, इष्टमित्रांसह मतदानासाठी यायचं हं! मतदार जागृती पत्रिका व्हायरल
By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 9, 2024 18:48 IST2024-04-09T18:47:32+5:302024-04-09T18:48:31+5:30
चि. मतदार व चि. सौ. कां. लोकशाही यांची लग्नपत्रिका व्हायरल

सगेसोयरे, इष्टमित्रांसह मतदानासाठी यायचं हं! मतदार जागृती पत्रिका व्हायरल
छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर सध्या एक लग्नपत्रिका चांगलीच व्हायरल होत आहे. ती निमंत्रण पत्रिका ‘मतदार जागृती पत्रिका’ आहे. यावर रील, शॉर्ट्स होत आहेत. रील शॉर्ट्समुळे ही पत्रिका अधिकच व्हायरल होत आहे. चि. मतदार व चि. सौ. कां लोकशाही यांच्या शुभविवाहाचीही पत्रिका नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय आहे.
आवाहनाला लग्नपत्रिकेचे स्वरूप
संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजवावा मतदानासाठी यावे, असे मतदारांना आवाहन या पत्रिकेतून करण्यात आले आहे. मतदारांमध्ये मतदानाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी या आवाहनाला लग्नपत्रिकेचे स्वरूप देण्यात आले आहे.
आग्रहाचे निमंत्रण
पत्रिकेवर सर्वांत वरील बाजूस कुलदेवता प्रसन्न लिहिले जाते. तिथे ‘मी प्रथमत: व अंतिमत: भारतीय’ असा मायना लिहिला आहे. त्याखाली ‘आग्रहाचे निमंत्रण’ ठळक अक्षरात आहे. श्री./ सौ.रा. रा. मतदाता १०८ औरंगाबाद पश्चिम यादी भाग ९९. चि. मतदार (भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव) व चि. सौ. कां. लोकशाही (भारतीय संविधानाची ज्येष्ठ सुकन्या) यांचा शुभविवाह, ही वधू-वरांची नावे आहेत.
तारीख व शुभमुहूर्तही ठरला
सोमवार दि.१३ मे २०२४ रोजी, सकाळी ७ ते सायं. ५ या शुभ मुहूर्तावर लोकसभा - २०२४च्या निमित्ताने भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी, उज्ज्वल भारताची स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपले एक पाऊल, आपला आवाज संसदेत पाठविण्यासाठी आपल्या एक-एक मतदानरूपी आशीर्वादाने हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा, यासाठी हेची निमंत्रण अगत्याचे..
मतदान करायला यायचं हं...
पत्रिकेवर आपले विनीत म्हणून आम्ही भारताचे लोक असे नमूद करण्यात आले आहे. तसेच वरील विनंतीला मान देऊन मतदान करायला यायचं हं... आमच्याशिवाय तर मज्जाच नाही.. कु. निळीशाई व चि. ई. व्ही. एम... असे मजेशीर वाक्य लिहिण्यात आले आहे.
आहेर आणि रिटर्न गिफ्ट
मतदार जनजागृती पत्रिकेत सर्वांत शेवटी ‘टीप’ लिहिण्यात आली आहे. हीच ‘टीप’ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. टीप : आपले मतदान हाच आमचा आहेर अन् विकसित भारत हेच तुमचे रिटर्न गिफ्ट. हे वाक्य लक्ष वेधून घेत आहे.
मै भारत हूं, भारत है मुझ में ही मतदार जागरूकता पत्रिकेवर मतदान केंद्र : न्यू इंग्लिश हायस्कूल, आयप्पा मंदिर, बीड बायपास देण्यात आले आहे. तसेच सोशल मीडियावर रील्स व्हायरल झाली. त्यात ‘भारत आहे, भारत माझाच आहे, मी ताकद आहे ताकद माझ्यात आहे, मतदान करू चला भारतासाठी’ असे गाणेही मतदारप्रिय होत आहे.