स्थानिक नेत्यांनी हात टेकले, छत्रपती संभाजीनगरचा 'पेच' आता फडणवीस-शिंदेंच्या दरबारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 19:14 IST2025-12-27T19:12:16+5:302025-12-27T19:14:07+5:30
मागील आठ दिवसांपासून सुरू असलेले बैठकांचे सत्र आणि आज शनिवारी झालेली ५ तासांची मॅरेथॉन बैठक होऊनही भाजप आणि शिंदेसेनेमध्ये काही जागांवरून एकमत होऊ शकले नाही.

स्थानिक नेत्यांनी हात टेकले, छत्रपती संभाजीनगरचा 'पेच' आता फडणवीस-शिंदेंच्या दरबारी!
छत्रपती संभाजीनगर: आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. मागील आठ दिवसांपासून सुरू असलेले बैठकांचे सत्र आणि आज शनिवारी झालेली ५ तासांची मॅरेथॉन बैठक होऊनही भाजप आणि शिंदेसेनेमध्ये काही जागांवरून एकमत होऊ शकले नाही. अखेर हा पेच सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घेतला आहे.
नेमकं कुठे अडलंय घोडे?
आज पार पडलेल्या बैठकीत महायुतीचे स्थानिक नेते काही ठराविक जागांवरून अडून बसले होते. भाजप आणि शिंदेसेना दोन्ही पक्ष स्वतःच्या बालेकिल्ल्यावर दावा सोडायला तयार नसल्याने पाच तासांच्या चर्चेनंतरही अंतिम तोडगा निघाला नाही. "आम्ही आमची बाजू मांडली आहे, पण काही जागांवर सामंजस्य न झाल्याने आता हा निर्णय वरिष्ठ पातळीवर व्हावा, अशी आमची इच्छा आहे," असे संकेत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले.
वरिष्ठांना पाठविले पत्र
या जागावाटपाचा तिढा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोर्टात गेला आहे. या तिन्ही नेत्यांना सविस्तर पत्र पाठवून निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, महायुती भक्कम आहे, परंतु जागावाटपाच्या तांत्रिक अडचणींमुळे हा विलंब होत आहे. लवकरच मुंबईतून यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.