मराठवाड्यात आता ‘वंचित’वर भाजपची भिस्त ! अपेक्षित ‘गणित’ जुळेल का, याविषयी साशंकताच

By नंदकिशोर पाटील | Published: April 20, 2024 04:43 PM2024-04-20T16:43:02+5:302024-04-20T16:44:10+5:30

भाजपाची मराठवाड्यात पुन्हा चौकार मारण्याची तयारी

BJP's trust in Marathwada on 'Vanchit'! Mahayutti's combined strength, Jarange factor concerns | मराठवाड्यात आता ‘वंचित’वर भाजपची भिस्त ! अपेक्षित ‘गणित’ जुळेल का, याविषयी साशंकताच

मराठवाड्यात आता ‘वंचित’वर भाजपची भिस्त ! अपेक्षित ‘गणित’ जुळेल का, याविषयी साशंकताच

छत्रपती संभाजीनगर: गेली दोन-अडीच वर्षांपासून मराठवाड्यात भाजपची मतपेरणी सुरू होती. लातूर, नांदेड, जालना आणि बीड या विद्यमान जागांसह उस्मानाबाद, औरंगाबाद आणि हिंगोली या तीन लोकसभा मतदारसंघांत जोरदार मोर्चेबांधणी केली होती. उमेदवारही जवळपास निश्चित होते. मात्र, राज्यातील नाट्यमय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे विरोधी पक्षातील दोन नेते त्यांच्या पक्षासह सोबत आल्याने भाजपच्या सगळ्या तयारीवर पाणी पडले. भाजपसह शिंदेसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांची महायुती झाली आणि ठरविलेल्या जागा मित्रपक्षाकडे गेल्या. म्हणजे असं की, मशागत करून तयार ठेवलेलं रान ऐन पेरणीच्या वक्ताला धाकट्या भावाच्या वाटणीला गेलं! उमेदवार ठरविण्यापासून केलेली सगळी मेहनत वाया तर गेलीच, शिवाय या वाटणीवरून घरातील भांड्यांची आदळआपट झाली ती वेगळीच! 

औरंगाबाद मतदारसंघात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे गेली दोन वर्षांपासून तयारी करत होते. मात्र, ही जागा शिंदेसेनेला गेली. उस्मानाबादमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील यांना उमेदवारी देण्याच्या आश्वासनावर भाजपमध्ये घेण्यात आले. पण, ही जागा ऐनवेळी अजित पवारांकडे गेली. हिंगोलीत रामदास पाटील यांनी तर क्लास वन अधिकारी पदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढण्याची तयारी केली होती. मात्र, ही जागाही शिंदेसेनेकडे गेली! या जागावाटपावर पक्षात नाराजी दिसून येते. शिवाय, जरांगे फॅक्टर हाही भाजपसाठी चिंतेचा विषय आहे.

मराठवाड्यात भाजपने चार जागांवर उमेदवार उभे केले आहेत. पैकी रावसाहेब दानवे (जालना), प्रताप पाटील चिखलीकर (नांदेड) आणि सुधाकर श्रृंगारे (लातूर) या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर, बीडमध्ये दोन टर्म खासदार राहिलेल्या प्रीतम मुंडे यांना घरी बसवून त्यांच्या जागी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मैदानात उतरविले आहे. भाजपकडे सध्या विद्यमान चार खासदारांसह अशोकराव चव्हाण आणि डॉ. अजित गोपछडे हे दोन राज्यसभा सदस्य, सोळा आमदार आणि दोन विधान परिषद सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. स्व. प्रमोद महाजन आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांनी मराठवाड्यात भाजप अतिशय निगुतीने रुजविला. परंतु, भाजपला शिवसेनेसोबतच्या युतीचा अधिक फायदा झाला. १९९५ च्या विधानसभेत युतीचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाले. त्यापूर्वी पुंडलिक दानवे (जालना) यांनी १९८९ साली पहिल्यांदा भाजपचे खाते उघडले. दानवे यांच्यानंतर उत्तमसिंह पवार, जालना (१९९६), जयसिंगराव गायकवाड, बीड (१९९८), श्रीमती रूपाताई निलंगेकर, लातूर (२००४) अशा प्रकारे लोकसभेच्या एखाद्या जागेवर भाजप विजयी होत असे. मात्र, २०१९ च्या मोदी लाटेत भाजपने थेट चौकार मारला! वर उल्लेख केलेल्या चारही जागा जिंकल्या. यावेळीही ते पुन्हा चौकार मारण्याच्या तयारीत आहेत. पण, यावेळी विरोधकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

‘वंचित’वर दारोमदार !
२०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे नांदेड, लातूर, हिंगोली या तीन जागांवरील काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. नांदेडमधून यशपाल भिंगे यांनी सुमारे १ लाख ६६ हजार, लातूरमध्ये राम गिरकर यांनी १ लाख १२ हजार, हिंगोलीत मोहन राठोड यांनी १ लाख ७४ हजार मते घेतली होती. यावेळीही ‘वंचित’वर भाजपची भिस्त आहे. मात्र, वंचितने मागील निवडणुकीत भरघोस मते घेतलेल्या उमेदवारांना डावलून यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने भाजपला अपेक्षित असलेले ‘गणित’ जुळेल का, याविषयी साशंकताच व्यक्त केली जात आहे.

Web Title: BJP's trust in Marathwada on 'Vanchit'! Mahayutti's combined strength, Jarange factor concerns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.