छत्रपती संभाजीनगरमध्ये अखेर भाजपची माघार; वरिष्ठांच्या दबावामुळे महायुतीवर ४ तास मंथन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 12:13 IST2025-12-25T12:11:08+5:302025-12-25T12:13:21+5:30
महायुतीचं 'सस्पेन्स' वाढलं! भाजप कोअर कमिटीचा ४ तास काथ्याकुट; आज शिंदेसेनेसोबत होणार आरपारची चर्चा

छत्रपती संभाजीनगरमध्ये अखेर भाजपची माघार; वरिष्ठांच्या दबावामुळे महायुतीवर ४ तास मंथन
छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या कोअर कमिटीने बुधवारी सायंकाळी चिकलठाणा येथील विभागीय कार्यालयात वरिष्ठांच्या आदेशानुसार चार तास महायुती करण्यावर काथ्याकुट केला. शिंदसेनेच्या नेत्यांसोबत गुरुवारी दुपारनंतर जागा वाटपाबाबत चर्चा होईल, त्यानंतर महायुती करायची की नाही याचा निर्णय हाेणार आहे. वरिष्ठ पातळीवरून सुरू असलेल्या फोनमुळे बुधवारी ऐनवेळेवर कोअर कमिटीच्या सदस्यांनी एकत्र येऊन चिंतन केले. शिंदेसेनेसोबत जाताना फरपट होऊ नये, दोन्ही बाजूंनी मतविभाजन होणार नाही, याची काळजी घ्यावी. यावर बैठकीत जोरदार चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
२०१५ साली भाजप लढलेल्या व जिंकलेल्या, शिवसेना जिंकलेल्या जागांचा आकडा, तसेच आता बदललेल्या परिस्थितीनुसार काय करायचे, याबाबत भाजपच्या कोअर कमिटीमध्ये टोकाची चर्चा झाली. चार तास काथ्याकुट केल्यानंतर कुठलाही अंतिम निर्णय झाला नाही. भाजपमध्ये गेल्या आठवड्यात आलेल्या इनकमिंगचा आणि महायुती होण्याचा काहीही संबंंध नाही. जिथे कमी तेथेच उमेदवारीची हमी, या तत्त्वावर ते प्रवेश झाले आहेत. फक्त अडचण नक्षत्रवाडीची आहे. तेथेही काहीतरी मार्ग काढण्यात येणार आहे.
महायुती झाल्यास अनेकांचा प्लॅन बी
भाजपला ज्या जागा लढायच्या आहेत, त्याची आकडेमोड आजच्या बैठकीत झाली आहे. पूर्व, पश्चिम, मध्य मतदारसंघनिहाय किती जागा वाढणार यासह भाजपने बेरीज करून ठेवली आहे. पूर्व मतदारसंघात काही प्रभाग पूर्ण भाजपचे तर काही प्रभाग शिंदसेनेचे आहेत. त्यात भाजप दोन व शिंदेसेना दोन असे सूत्र ठरले आहे, त्यानुसार जागांची आकडेमोड झाल्याचे सूत्रांनी सांगितले. युती झाल्यास अनेकांचे राजकीय बळी जातील तर काही जण बंडखोरी किंवा महाविकास आघाडीत जातील, शिंदेसेना व भाजपमधील अनेकांचा बी प्लान तयार आहे.
महायुती होईलच....
पक्ष कार्यालयात बैठक झाली. गुरुवारी अंतिम आकडा ठरेल, दोन पावले आम्ही मागे आलो आहोत. दोन पाऊल त्यांना मागे यावे लागेल. दोन्ही पक्षांच्या जागांच्या आकड्याचा सकारात्मक निर्णय होईल. महायुती होईल, या बाजूने सुरुवातीपासून आमची सकारात्मक भूमिका आहे.
--अतुल सावे, ओबीसी कल्याणमंत्री
मतांची विभागणी रोखण्यासाठी युती...
युतीची तयारी करण्यासाठी बैठक होती. सन्मानाने दोन्ही पक्ष युती करतील. आम्हाला युती करायची आहे, हिंदुमतांची विभागणी होऊ नये, यासाठी युती करायची आहे. सर्वांनी सामंजस्याने निर्णय घ्यायचा आहे.
भाजपप्रमाणे शिंदेसेनादेखील समजदारीची भूमिका घेईल. भाजपच्या कोअर कमिटीची अंतर्गत बैठक होती.
--शिरीष बोराळकर, कोअर कमिटी सदस्य