बहिणीच्या घरी आमरस खाण्यासाठी जाणाऱ्या बाप-लेकाचा अपघाती मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 17:54 IST2022-06-12T17:34:27+5:302022-06-12T17:54:44+5:30
ही घटना भोकरदन तालुक्यातील ईब्राहिमपूर येथे घडली आहे.

बहिणीच्या घरी आमरस खाण्यासाठी जाणाऱ्या बाप-लेकाचा अपघाती मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
फकिरा देशमुख
भोकरदन: बहिणीच्या घरी आमरसाचा पाहुणचार खाण्यासाठी निघालेल्या भावासह त्याचा लहान मुलाचा अपघातीमृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना भोकरदन तालुक्यातील ईब्राहिमपूर येथे घडली आहे. तसेच, या अपघातात जखमी झालेली भावजय मृत्यूशी झुंझ देत आहे.
सविस्तर माहिती अशी की, भोकरदन तालुक्यातील ईब्राहिमपूरच्या रामेश्वर वाडी येथील शंकर भागचंद महेर(वय 30) ममता शंकर महेर(वय 25) व मुलगा रोहन शंकर महेर वय(10) यांच्यासह दुचाकीवर निघाले होते. आज म्हणजेच 12 जून रोजी सकाळी 10 ते 11 वाजेच्या दरम्यान ते भोकरदनकडून पासोडी(ता.जाफराबाद) येथे बहिणीच्या घरी आमरसाचे जेवण करण्यासाठी निघाले. यादरम्यान वाटेत माहोरा ते जाफराबाद रोडवरील वीटभट्टीजवळ विटाने भरलेल्या टॅक्टरला त्यांची पाठीमागून धडक लागली.
या अपघातात शंकर महेर व रोहन महेर या बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी ममता महेर या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बहिणीने फोडला हंबरडा
जेवणासाठी वाट बघत असलेल्या बहिणीला भाऊ व भाचा अपघातात ठार झाल्याची बातमी कळताच त्यांनी हंबरडा फोडला. त्या भावाच्या व भाच्याच्या अंत्यविधीसाठी भोकरदन तालुक्यातील रामेश्वर वाडी येथे दाखल झाल्या असून या बाप लेकावर रात्री शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.