काँग्रेसचे सत्तेचे स्वप्न भंगले? उद्धवसेना महापौर पदावर ठाम, वडेट्टीवार म्हणाले, "विरोधी पक्षात बसू"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 11:05 IST2026-02-10T11:02:53+5:302026-02-10T11:05:10+5:30
चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करताना काँग्रेस समोरील संकटे संपताना दिसत नाहीत. आधी पक्षातील गटबाजी उफाळली. ती शांत केल्यानंतर आता उद्धवसेनेने काँग्रेसला कोंडीत पकडले आहे.

काँग्रेसचे सत्तेचे स्वप्न भंगले? उद्धवसेना महापौर पदावर ठाम, वडेट्टीवार म्हणाले, "विरोधी पक्षात बसू"
चंद्रपूर महापालिकेमध्ये सर्वाधिक जागा जिंकत काँग्रेस सत्तेजवळ पोहोचली. पण, बहुमतासाठी लागणारा आकडा जुळवताना आता पक्षाची दमछाक झाल्याचे दिसत आहे. आधी खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील संघर्षाने काँग्रेसची कटकट वाढवली. त्यातून मार्ग काढल्यानंतरही सत्तेचा मार्ग सुकर झालेला नाही. उद्धवसेनेने महापौर पदाची मागणी केली असून, त्यावर जिल्हाप्रमुख ठाम असल्याने आता काँग्रेसने विरोधी बाकावर बसण्याची तयारीही सुरू केली आहे.
चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत. चार नगरसेवक त्यांच्यासोबत आघाडी केलेल्या स्थानिक पक्षाचे आहेत. पण, बहुमतासाठी काँग्रेस आणखी तीन नगरसेवकांची गरज आहे. उद्धवसेनेचे सहा नगरसेवक असून, आम्हाला अडीच वर्ष महापौर पद हवे अशी भूमिका पक्षाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे.
वडेट्टीवारांसोबतच्या बैठकीतून रागात निघाले गिऱ्हे
विजय वडेट्टीवार आणि संदीप गिऱ्हे यांची बैठक चंद्रपूरमध्ये होती. पण, अचानक संदीप गिऱ्हे हे रागारागात बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, त्यांना भाजपाची फूस आहे. त्यांना भाजपाने ऑफर दिली आहे.
काँग्रेसने उद्धवसेनेला काय प्रस्ताव दिला?
विजय वडेट्टीवार म्हणाले, "आमच्याकडे ३१ नगरसेवक आहेत. उद्धवसेनेला आम्ही स्थायी समिती अध्यक्ष पदाची ऑफर दिली. गरज पडली तर त्यांना उपमहापौर पद देऊ. त्यांना महापौर पद पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे आणि त्यावर आमची चर्चा सुरू आहे. नाही झाले तर विरोधी पक्षात बसू."
"उद्धवसेनेला भाजपाकडून फूस आहे. भाजपाने उद्धवसेनेला ऑफर दिलेली आहे. आम्ही पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आमची संख्या ३१ पर्यंत गेली आहे. पण, बहुमताचा आकडा ३४ आहे. त्यात तीनची आवश्यकता आहे. आम्ही स्थायी समिती आणि उपमहापौर पद द्यायचे कबूल केले, पण त्यांना भाजपाकडून ऑफर असल्याची त्यांनी माहिती दिली. ते निघून गेले. आता मी आणि खासदार यावर चर्चा करू", असे वडेट्टीवार म्हणाले.
काँग्रेसचा महापौर कसा होतो, ते बघतो -संदीप गिऱ्हे
वडेट्टीवार यांच्यासोबतच्या बैठकीतून रागात बाहेर पडलेले उद्धवसेनेचे संदीप गिऱ्हे म्हणाले की, "अर्ज मागे घेतलेला नाही. आम्ही विचार करू. काँग्रेसचा आमच्याशिवाय महापौर होत असेल, तर मी पण बघतो की त्यांचा महापौर कसा होतो? काँग्रेसला आमच्या शुभेच्छा आहेत. आदित्य ठाकरेंशी बोलणं झाले, त्यांचेही म्हणणे आहे की आपला महापौर झाला पाहिजे", अशी भूमिका संदीप गिऱ्हे यांनी मांडली.
भाजपाकडूनही सत्तेसाठी प्रयत्न
भाजपाकडूनही चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला महापौर पद देईल त्याच्यासोबत आम्ही जाऊ, अशी भूमिका उद्धवसेनेची सुरूवातीपासूनच आहे. त्यामुळे भाजपालाही अखेरच्या क्षणी राजकारण बदलण्याची आशा आहे. पण, काँग्रेसला सर्वाधिक जागा असूनही महापालिकेत सत्ता स्थापन करताना दमछाक लागल्याचे चित्र आहे.