मतदारांनी काँग्रेसवर दाखवला स्पष्ट विश्वास; कौल सत्तेत रूपांतरित करण्यात मात्र अपयशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 15:34 IST2026-02-11T15:31:27+5:302026-02-11T15:34:40+5:30
Chandrapur : जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांत जनतेने काँग्रेसच्या पारड्यात कौल टाकला होता. त्याच विश्वासाची पुनरावृत्ती चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीतही झाली.

Voters showed clear faith in Congress; however, it failed to convert the vote into power
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांत जनतेने काँग्रेसच्या पारड्यात कौल टाकला होता. त्याच विश्वासाची पुनरावृत्ती चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीतही झाली. २७ नगरसेवक निवडून देत मतदारांनी काँग्रेसवर स्पष्ट विश्वास व्यक्त केला. मात्र हा कौल सत्तेत रूपांतरित करण्यात काँग्रेस अपयशी ठरली आणि हातची आलेली सत्ता निसटली. अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे.
काँग्रेसकडे अनुभवसंपन्न आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासारखा दिग्गज नेता आणि अडीच लाख मतांनी विजयी झालेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासारखी ताकद होती. असे असतानाही सत्ता गमवावी लागली. पक्ष नेमका कुठे चुकला, याची मीमांसा होणे आता अपरिहार्य झाले आहे.
निवडणूक निकाल काँग्रेसच्या बाजूने लागत असतानाच पक्षाचे लक्ष सत्ता स्थापनेपेक्षा गटवर्चस्वाकडे वळले. तिकीट वाटपापासून सुरू झालेली गटबाजी महापौर निवडणुकीच्या दोन दिवस आधी नेत्यांमधील तात्पुरत्या सामंजस्याने थांबली. मात्र मनातून एकत्र येण्याऐवजी 'आपल्याच गटाचा महापौर' या अट्टाहासानेच निर्णय घ्यायला सुरुवात झाली. संख्याबळ वाढविण्यासाठी तडजोडीचे राजकारण कुठेच दिसले नाही. गटनेतेपदावरून सुरू असलेली रस्सीखेच थेट दिल्लीपर्यत गेली, तरीही तोडगा निघाला नाही. गटबाजी असूनही अनुभवाच्या आधारावर सत्ता स्थापनेची धुरा आमदार वडेट्टीवारांकडे सोपविली असती, तर महानगरपालिकेतील अनेक वर्षांपासून हरवलेली सत्ता काँग्रेसच्या हाती आली असती, अशी चर्चा आता कार्यकर्त्यांत सुरू आहे.
दुसरीकडे भाजपमध्येही तीव्र गटबाजी होती. मात्र पक्षाने सत्ता स्थापनेची जबाबदारी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे दिली. त्यांनी राजकीय अनुभवाच्या बळावर ही जबाबदारी समर्थपणे निभावली. आमदार किशोर जोरगेवार यांचीही त्यांना ठाम साथ मिळाली. पक्षासाठी झटण्याची ही इच्छाशक्ती काँग्रेसमध्ये दिसली नाही.
उद्धवसेनेच्या बाबतीतही काँग्रेसची भूमिका आत्मघातकी ठरली. आघाडीचा घटक पक्ष म्हणून उद्धवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिहे काँग्रेससोबत निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र त्यांना दूर ठेवले. स्वतंत्र लढत देत उद्धवसेनेने वंचितसोबत नियोजनबद्ध पद्धतीने निवडणूक लढवत आपली ताकद दाखवली. मग महापौरपदाच्या मागणीत काहीच गैर नव्हते. भाजपसोबत ज्या तडजोडीने त्यांनी सत्ता मिळवली, तीच तडजोड काँग्रेससोबत का शक्य झाली नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे. 'आपणच मोठा पक्ष' या साक्षात्कारातच काँग्रेसने सर्व काही गमावले. हातात सत्ता असतानाही मुठीत काहीच उरले नाही, अशीच अवस्था अखेर काँग्रेसची झाली.