उद्धवसेनेचा काँग्रेसला मोठा झटका, भाजपासोबत युती! संगीता खांडेकर महापौर, उद्धवसेनेला काय मिळणार?
By राजेश भोजेकर | Updated: February 10, 2026 11:47 IST2026-02-10T11:46:28+5:302026-02-10T11:47:44+5:30
Chandrapur Municipal Mayor Election 2026: चंद्रपूर महापालिकेच्या निमित्ताने उद्धवसेना आणि भाजपा याची युती पुन्हा झाली आहे. काँग्रेसकडून ताणले जात असल्याने उद्धवसेनेने ऐनवेळी भाजपासोबत जात सत्ता स्थापनेची घोषणा केली.

उद्धवसेनेचा काँग्रेसला मोठा झटका, भाजपासोबत युती! संगीता खांडेकर महापौर, उद्धवसेनेला काय मिळणार?
- राजेश भोजेकर, चंद्रपूर
चंद्रपूर महानगरपालिकेच्या आज होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीचा सस्पेन्स अखेर संपला. भाजपा आणि उद्धवसेना यांच्यात सत्ता समझोता झाला आहे. ठरलेल्या करारानुसार महापौरपदभाजपाकडे, तर उपमहापौरपद उद्धवसेनेकडे देण्यावर दोन्ही पक्षांत सहमती झाली आहे. ऐनवेळी झालेल्या पडद्यामागील घडामोडींमुळे हे सत्ता समीकरण अंतिम झाले. उद्धवसेनेला भाजपाने सव्वा वर्षे महापौर पद देण्याचे मान्य केले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी याबद्दलची माहिती दिली.
निवडणुकीआधी भाजपाने आपल्या उमेदवारासाठी अधिकृत व्हीप जारी करत आक्रमक भूमिका घेतली होती. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपने शिस्तबद्ध मतदानाची रणनीती आखली. दुसरीकडे काँग्रेसकडून उद्धवसेनेला सोबत घेण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू होते. मात्र महापौरपदावर ठाम असलेल्या उद्धवसेनेने मंगळवारी (१० फेब्रुवारी) आमदार किशोर जोरगेवार यांच्या समक्ष झालेल्या बैठकीत अखेर उपमहापौरपद स्वीकारत सत्ता समझोत्याला हिरवा कंदील दिला.
काँग्रेसचे गणित फसले
काँग्रेसकडे संख्याबळ असूनही स्पष्ट बहुमत न जमल्याने सत्ता स्थापनेचे गणित बिघडले. नागपूर आणि चंद्रपूर येथे वरिष्ठ नेत्यांच्या बैठका, थेट हस्तक्षेप आणि वाटाघाटी करूनही काँग्रेसला यश आले नाही. उद्धवसेनेने भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस विरोधातच राहिली.
व्हीप ठरला निर्णायक
मतदानाआधी भाजपने जारी केलेला व्हीप हा निकालाचा निर्णायक घटक ठरला. भाजपा आणि शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी एकजुटीने मतदान करत महापौरपद भाजपाकडे खेचून आणले. उपमहापौरपद उद्धवसेनेला देऊन सत्तेत सहभागी करून घेण्याची भाजपाची रणनीती यशस्वी ठरली.
मनपात सत्तेचा नवा अध्याय
भाजपाचा महापौर आणि उद्धवसेनेचा उपमहापौर या समीकरणामुळे चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तेचा नवा अध्याय सुरू झाला आहे. विकासकामे, स्थायी समिती आणि प्रशासनावर वर्चस्वासाठी पुढील काळात राजकीय हालचाली तीव्र होण्याची शक्यता आहे. अखेर, ऐनवेळी झालेल्या सत्तासमझोत्यामुळे चंद्रपूर मनपात भाजप सत्तेत राहिला असून, उद्धवसेना उपमहापौरपदाच्या माध्यमातून सत्तेत सहभागी झाली आहे.
महापालिकेतील सत्तेचे वाटप कसे?
आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, पहिले सव्वा वर्ष महापौर भाजपाचा असेल, नंतरचे सव्वा वर्षे महापौर उद्धवसेनेचा असेल.
उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे म्हणाले की, "काँग्रेस आम्हाला शेवटच्या वर्षातही महापौर द्यायला तयार नव्हती. त्यामुळे आम्हाला भाजपासोबत जावे लागले. नंतरच्या सव्वा वर्षात महापौर उद्धवसेनेचा असेल. पाच वर्षे उपमहापौर उद्धवसेनेचा असेल. स्थायी समितीही पहिले एक वर्ष आणि शेवटचे एक वर्ष उद्धवसेनेकडे असेल", अशी माहिती गिऱ्हे यांनी दिली.