चंद्रपूर जागा वाटप : भाजपचे सस्पेन्स, काँग्रेसमध्ये खलबते;वडेट्टीवारांचा चंद्रपुरात ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:17 IST2025-12-30T16:15:52+5:302025-12-30T16:17:50+5:30
Chandrapur : महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता काहीच तास उरले असताना एकाही बड्या पक्षाकडून उमेदवारांच्या अंतिम यादीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. काँग्रेसचेही अजून ठरलेले नाही.

Chandrapur seat allocation: BJP's suspense, Congress's turmoil; Vadettiwar's stay in Chandrapur
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता काहीच तास उरले असताना एकाही बड्या पक्षाकडून उमेदवारांच्या अंतिम यादीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. काँग्रेसचेही अजून ठरलेले नाही. भाजपच्या यादीवर मुंबईत शिक्कामोर्तब होण्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे बैठकांचे सत्रच सुरू आहे. उमेदवारी वाटपावरून नेत्यांची कसोटी लागत आहे. इच्छुकांची मनधरणी करून त्यांचे बंड थोपवण्याचे मोठे आव्हान आहे. उमेदवारीचा तिढा सोडविण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार नेते विजय वडेट्टीवार चंद्रपुरात ठिय्या मांडून आहेत.
जागा वाटपासाठी काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री उशिरापर्यंत बैठक चालली. दरम्यान, काही जागांवरून रस्सीखेच झाल्याचे समजते. काहींचे तिकीट कापण्याचीही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत सोमवारी पुन्हा अशाच प्रकारची बैठक उभय नेत्यांमध्ये होणार असल्याचे समजते. या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भाजपचे मुंबईत ठरणार
भाजपमधील उमेदवारीचा तिढा मुंबईत पोहोचला आहे. उमेदवारांची यादी तयार झालेली आहे. पक्षात एकवाक्यता नसल्याच्या बातम्यांमुळे इच्छुकांची चांगलीच घालमेल सुरू आहे. कोणाला तिकीट मिळेल आणि कोणाची कापली जाईल, हा संभ्रम कायम आहे. स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नसल्यामुळे भाजपत अत्यंत गोपनीयता बाळगली जात आहे.
काय म्हणाले, आमदार वडेट्टीवार
याबाबत आमदार वडेट्टीवार यांच्याशी चर्चा केली असता काँग्रेसमधील उमेदवारांची यादी जवळपास निश्चित झालेली आहे. पक्षातील नेत्यांचीही या यादीवर २० टक्के सहमती झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला सोबत घेण्याच्या अनुषंगाने विचार विनिमय सुरू आहे. त्यांना कोणत्या आणि किती जागांवर त्यांची ताकद आहे. या दृष्टीने विचार सुरू आहे. काँग्रेस जेथे निवडून येण्याची दाट शक्यता आहे. अशा जागा सोडणार नाही. रिपाइं खोब्रागडे गट सोबत आहे. या दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी चार जागांची मागणी असून त्यावर विचार सुरू आहे. याबाबत लवकरच तोडगा निघेल, असेही ते म्हणाले.