मोठी बातमी: धानोरकर की वडेट्टीवार?; चंद्रपूर लोकसभेसाठी अखेर काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 09:02 PM2024-03-24T21:02:26+5:302024-03-24T21:07:29+5:30

काँग्रेसने महाराष्ट्रातील पहिल्या उमेदवार यादीत चंद्रपूरचा उमेदवार जाहीर करणं टाळलं होतं. मात्र आता उमदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस बाकी असल्याने पक्षाने याबाबत अंतिम निर्णय घेतला आहे.

Big News pratibha Dhanorkar or vijay Vadettiwar Congress has finally announced its candidate for Chandrapur Lok Sabha | मोठी बातमी: धानोरकर की वडेट्टीवार?; चंद्रपूर लोकसभेसाठी अखेर काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा

मोठी बातमी: धानोरकर की वडेट्टीवार?; चंद्रपूर लोकसभेसाठी अखेर काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा

Chandrapur Lok Sabha ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरही पहिल्या टप्प्यात ज्या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे त्या चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीवरून मोठा तिढा निर्माण झाला होता. काँग्रेसचे दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर या गेल्या अनेक महिन्यांपासून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असताना काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनीही पक्षाकडे तिकिटाची मागणी केल्याने तिढा निर्माण झाला होता. मात्र काँग्रेस नेतृत्वाने अखेर हा तिढा सोडवत प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला होता आणि ती जागा होती चंद्रपूर लोकसभेची. या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी विजय मिळवला होता. मात्र मागील वर्षी त्यांचं निधन झालं. तेव्हापासून ही जागा रिक्त होती. याच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी आपण इच्छुक असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतर प्रतिभा धानोरकर यांनी जाहीररित्या आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे काँग्रेसने महाराष्ट्रातील पहिल्या उमेदवार यादीत चंद्रपूरचा उमेदवार जाहीर करणं टाळलं होतं. मात्र आता उमदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस बाकी असल्याने पक्षाने याबाबत अंतिम निर्णय घेत काही वेळापूर्वी प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

भाजपकडून सुधीर मुनगंटीवार मैदानात

भाजपने यंदा धक्कातंत्राचा अवलंब करत राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मुनगंटीवार यांनी १९८९ मध्ये महाविद्यालयामध्ये विद्यार्थी असताना पहिली लोकसभा लढवली. दुसऱ्या निवडणुकीला ते १९९१ मध्ये सामोरे गेले. पण मुनगंटीवार हे १९९५ पासून आजच्या क्षणापर्यंत चंद्रपूर विधानसभेतून तीनदा आमदार झाले. तसंच त्यांनी तीनदा बल्लारशा विधानसभेचे नेतृत्व केले.  मुनगंटीवार हे ३४ वर्षानंतर पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Web Title: Big News pratibha Dhanorkar or vijay Vadettiwar Congress has finally announced its candidate for Chandrapur Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.