Oil Crisis Warning For Trump : अमेरिका आणि इराणमधील वाढत्या युद्धजन्य तणावामुळे जागतिक स्तरावर इंधन संकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ आणि विस्कळीत झालेली पुरवठा साखळी यावर नियंत्रण मिळवणे कठीण असल्याचे संकेत आता तेल उद्योगातूनच मिळू लागले आहेत. अमेरिकेतील दिग्गज तेल कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊन ऊर्जा संकट अधिक गंभीर होण्याचा इशारा दिला आहे.
जागतिक पुरवठ्याचा मुख्य अडथळा
'वॉल स्ट्रीट जर्नल'ने दिलेल्या वृत्तानुसार, एक्सॉन मोबिल, शेवरॉन आणि कोनोकोफिलिप्स यांसारख्या कंपन्यांच्या सीईओंनी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प प्रशासनाशी चर्चा केली. होर्मुजची सामुद्रधुनी या सागरी मार्गावरून होणाऱ्या तेल आणि वायूच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यास जागतिक ऊर्जा बाजारात मोठी अस्थिरता निर्माण होईल, अशी भीती या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कच्च्या तेलाचे दर १०० डॉलरच्या पार
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रचंड वाढलेले आहेत. सोमवारी ब्रेंट क्रूड १०५ डॉलर प्रति बॅरलवर, तर WTI क्रूड १०० डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत होते. एक्सॉनचे सीईओ डॅरेन वुड्स यांनी इशारा दिला आहे की, जर सट्टेबाजांनी बाजारात बोली लावून किमती वाढवल्या, तर कच्चे तेल सध्याच्या विक्रमी पातळीलाही पार करू शकते. यामुळे केवळ कच्चे तेलच नाही, तर रिफाइंड प्रोडक्ट्स (पेट्रोल-डिझेल) चा पुरवठाही मोठ्या प्रमाणात घटू शकतो.
संकटावर मात करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाचे ३ पर्याय
ट्रम्प प्रशासन किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत करण्यासाठी खालील पर्यायांचा विचार करत असल्याचे समजते.
- रशियन तेलावरील निर्बंध शिथिल करणे : रशियन तेलाच्या आयातीवर असलेली बंदी उठवून पुरवठा वाढवणे.
- इमर्जन्सी रिझर्व्हचा वापर : अमेरिकेच्या आपत्कालीन कच्च्या तेलाच्या साठ्यातून तेल बाजारात आणणे.
- व्हेनेझुएला कडून आयात : व्हेनेझुएलाकडून तेलाचा ओघ वाढवून जागतिक तुटवडा भरून काढणे.
वाचा - e-KYC आणि शेतकरी ओळखपत्र सर्व काही अपडेट असूनही, पैसे जमा झाले नाही? कुठे कराल तक्रार?
होर्मुज मार्ग उघडणे हाच एकमेव उपाय
तेल उद्योगातील अधिकाऱ्यांनी ट्रम्प प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, जोपर्यंत होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा सुरक्षितपणे खुली होत नाही, तोपर्यंत जागतिक ऊर्जा बाजारात स्थैर्य येणे अशक्य आहे. हा मार्ग जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, तो बंद राहिल्यामुळे भारतासह अनेक आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे.
