अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवरील अमेरिकन नियंत्रणाला विरोध करणाऱ्या ८ युरोपीय देशांवर १० टक्के टॅरिफ (व्यापार कर) लावण्याची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे संतप्त झालेल्या युरोपीय नेत्यांनी आणि राजनैतिक अधिकाऱ्यांनी इशारा दिलाय की, हे पाऊल अमेरिका-युरोप संबंध कमकुवत करू शकते आणि एक 'धोकादायक नकारात्मक चक्र' सुरू करू शकते. ट्रम्प यांनी शनिवारी घोषणा केली होती की डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, नेदरलँड्स आणि फिनलंडवर १० टक्के टॅरिफ लावला जाईल.
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी ग्रीनलँड महत्त्वाचं नाटो (NATO) आघाडीत सामील असलेल्या डेन्मार्कचा निम-स्वायत्त प्रदेश असलेला 'ग्रीनलँड' अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचा असल्याचं ट्रम्प मानतात आणि ते सतत त्यावर ताबा मिळवण्याबाबत बोलत राहिले आहेत. विश्लेषकांचं म्हणणं आहे की, अमेरिकेची ही टॅरिफ लावण्याची घोषणा डेन्मार्क आणि इतर युरोपीय देशांना ग्रीनलँडच्या दर्जावर वाटाघाटी करण्यासाठी दबावाखाली आणण्याची रणनीती असू शकते. ही घोषणा अशा वेळी आली आहे जेव्हा ग्रीनलँडमधील हजारो रहिवासी राजधानी 'नूक' मधील अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर निषेध प्रदर्शन करत होते.
वाढत्या मतभेदांचा रशिया, चीनला फायदा
अलीकडच्या काळात अनेक युरोपीय देशांनी ग्रीनलँडमध्ये मर्यादित संख्येनं सैन्यही पाठवलं आहे, ज्याचा उद्देश आर्क्टिक प्रदेशात सुरक्षा प्रशिक्षण असल्याचं सांगितलं गेलं. युरोपीय संघाच्या परराष्ट्र धोरण प्रमुख काजा कालास यांनी म्हटलं की, अमेरिका आणि युरोपमधील वाढत्या मतभेदांचा फायदा चीन आणि रशियाला मिळेल. कालास यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की, “जर ग्रीनलँडच्या सुरक्षेला धोका असेल तर तो नाटो आघाडीच्या अंतर्गत सोडवला जाऊ शकतो. अशा प्रकारे टॅरिफ लावल्यानं युरोप आणि अमेरिका दोन्ही गरीबीत जातील आणि सामायिक समृद्धी कमकुवत होईल.”
ट्रान्स-अटलांटिक संबंधांना तडा जाईल
युरोपियन युनियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयेन यांनी एका संयुक्त निवेदनात डेन्मार्क आणि ग्रीनलँडबद्दल पूर्ण एकता दर्शवताना, हे टॅरिफ ट्रान्स-अटलांटिक संबंधांचे नुकसान करतील असं म्हटलं. ट्रम्प यांच्या या पावलावर अमेरिकेतही टीका झाली आहे. अमेरिकन सिनेटर मार्क केली यांनी, मित्र देशांवर टॅरिफ लावल्याने अमेरिकन लोकांना जास्त किंमत मोजावी लागेल आणि अमेरिकेच्या जागतिक प्रतिष्ठेचे नुकसान होईल अशी चिंता व्यक्त केली.
मेलोनी यांनीही निर्णयाला 'चुकीचं' म्हटलं
युरोपमध्ये ट्रम्प यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही हा निर्णय एक 'चूक' असल्याचं म्हटलं. त्याच वेळी, ब्रिटनमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनीही या निर्णयावर टीका केली. ब्रिटीश पंतप्रधान केअर स्टार्मर यांनी, युरोपच्या देशांवर टॅरिफची घोषणा 'पूर्णपणे चुकीची' आहे आणि त्यांचं सरकार हे प्रकरण अमेरिकन प्रशासनासमोर मांडणार असल्याचं म्हटलं.
