PPF Loan News: बहुतेक लोक पब्लिक प्रॉव्हिडंट फंडकडे (PPF) फक्त कर वाचवण्यासाठी किंवा निवृत्तीनंतरची सोय म्हणून पाहतात. पण, हेच खातं तुमच्या अडचणीच्या काळात 'आर्थिक आधार' देखील बनू शकतं. जेव्हा अचानक पैशांची गरज भासते, तेव्हा महागड्या वैयक्तिक कर्जाच्या (Personal Loan) मागे न धावता पीपीएफवर कर्ज घेण हा एक स्मार्ट निर्णय ठरू शकतो.
पीपीएफ कर्ज म्हणजे काय?
पीपीएफवरील कर्ज ही अशी सुविधा आहे जिथे तुमचाच जमा केलेला फंड हमी म्हणून वापरला जातो. ज्यांचं खातं अजून जुनं झालेलं नाही आणि ज्यांना तातडीनं पण कमी कालावधीसाठी निधी हवा आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. पीपीएफचा लॉक-इन कालावधी १५ वर्षांचा असला, तरी सुरुवातीच्या काळात खातेदारांची गरज ओळखून सरकारनं ही कर्जाची सोय उपलब्ध करून दिली आहे. यासाठी सिबिल स्कोअर किंवा जास्त कागदपत्रांची कटकट नसते.
कर्ज कोणाला आणि कधी मिळते?
पीपीएफवर कर्ज घेण्याची एक ठराविक वेळ असते.
कालावधी : तुम्ही खातं उघडल्यापासून तिसऱ्या वर्षापासून ते सहाव्या वर्षाच्या शेवटपर्यंत कर्जासाठी अर्ज करू शकता.
सक्रिय खातं : तुमचं खातं चालू असणं गरजेचं आहे, म्हणजेच दरवर्षी किमान ५०० रुपये जमा केलेले असावेत.
महत्वाची अट : सातव्या वर्षापासून तुम्ही खात्यातून पैसे काढण्यास पात्र ठरता, त्यामुळे त्यानंतर कर्जाची सुविधा बंद होते.
किती रक्कम मिळते?
तुम्ही तुमच्या खात्यातील सर्वच्या सर्व रक्कम कर्ज म्हणून घेऊ शकत नाही. ज्या वर्षी तुम्ही कर्जासाठी अर्ज करत आहात, त्याच्या आधीच्या दोन वर्षांच्या अखेरीस जो बॅलन्स होता, त्याच्या जास्तीत जास्त २५% रक्कम तुम्हाला मिळते. उदाहरणार्थ, २०२६ मध्ये तुम्ही कर्ज घेत असाल आणि ३१ मार्च २०२४ ला तुमच्या खात्यात १ लाख रुपये असतील, तर तुम्हाला २५,००० रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं.
व्याजदर आणि परतफेड
या कर्जाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याचा अत्यंत कमी व्याजदर.
१% अतिरिक्त व्याज : तुम्हाला मिळणाऱ्या व्याजापेक्षा फक्त १% जास्तीचं व्याज तुम्हाला द्यावं लागते. समजा पीपीएफवर ७.१% व्याज मिळत असेल, तर कर्जाचा प्रभावी दर फक्त १% अधिक पडतो.
परतफेडीची मुदत : हे कर्ज ३६ महिने म्हणजेच ३ वर्षांच्या आत फेडणं आवश्यक आहे. जर विलंब झाला, तर १% व्याजाचा दर थेट ६% पर्यंत वाढू शकतो.
नियम : आधी मूळ रक्कम फेडावी लागते आणि त्यानंतर शेवटच्या दोन हप्त्यांमध्ये व्याजाची रक्कम भरावी लागते.
अर्ज कसा करावा?
तुम्ही तुमच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये 'फॉर्म डी' भरून अर्जासोबत पीपीएफ पासबुक जमा केल्यास, पडताळणीनंतर पैसे तुमच्या बचत खात्यात जमा केले जातात.
फायदे आणि तोटे
फायदे :
१. काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही.
२. पर्सनल लोनपेक्षा खूपच स्वस्त पर्याय.
३. क्रेडिट स्कोअरची अट नाही.
तोटे :
१. तुम्ही जितकी रक्कम कर्ज म्हणून घेता, त्या रकमेवर तुम्हाला मिळणारं वार्षिक व्याज बंद होतं.
२. परतफेडीसाठी फक्त ३ वर्षांचा मर्यादित वेळ मिळतो.
३. पहिलं कर्ज फेडल्याशिवाय दुसरं कर्ज घेता येत नाही.
थोडक्यात, अल्प कालावधीच्या पैशांच्या टंचाईवर पीपीएफवरील कर्ज हा एक उत्तम उपाय आहे. हे तुम्हाला कर्जाच्या जाळ्यातून वाचवतं, पण निवृत्तीचा निधी सुरक्षित ठेवण्यासाठी याची वेळेत परतफेड करणं तितकंच महत्त्वाचं आहे.
