Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > किती मोठा आहे देशातील आईस्क्रीमचा व्यवसाय? अंबानींच्या एन्ट्रीने बड्या ब्रँड्सची झोप उडाली

किती मोठा आहे देशातील आईस्क्रीमचा व्यवसाय? अंबानींच्या एन्ट्रीने बड्या ब्रँड्सची झोप उडाली

अनंत अंबानी यांनी 'वंतारा क्रीमरी' ब्रँडअंतर्गत आईसक्रीमचे १७ फ्लेव्हर्स लॉन्च केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 11:47 IST2026-05-19T11:46:24+5:302026-05-19T11:47:04+5:30

अनंत अंबानी यांनी 'वंतारा क्रीमरी' ब्रँडअंतर्गत आईसक्रीमचे १७ फ्लेव्हर्स लॉन्च केले आहेत.

Anant Ambani Vantara Creamery How big is the ice cream business in the India? Ambani's entry has woken up big brands | किती मोठा आहे देशातील आईस्क्रीमचा व्यवसाय? अंबानींच्या एन्ट्रीने बड्या ब्रँड्सची झोप उडाली

किती मोठा आहे देशातील आईस्क्रीमचा व्यवसाय? अंबानींच्या एन्ट्रीने बड्या ब्रँड्सची झोप उडाली

Anant Ambani Vantara Creamery: भारतात उन्हाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. अशा कडक उन्हात अनेकजण थंडावा मिळवण्यासाठी थंड पेये आणि आईस्क्रीम खातात. आता याच आईस्क्रीम मार्केटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी आईस्क्रीम क्षेत्रात एन्ट्री घेतली असून, 'वंतारा क्रीमरी' ब्रँडअंतर्गत आईस्क्रीमचे १७ फ्लेव्हर्स लॉन्च केले आहेत. अंबानी कुटुंबाच्या एन्ट्रीमुळे या व्यवसायातील स्पर्धा कमालीची तीव्र होणार आहे.

५ वर्षांत बाजारपेठ दुप्पट! काय सांगतात आकडेवारी?

दरम्यान, 'आयमार्क' च्या ताज्या अहवालानुसार, भारतातील आईस्क्रीमची बाजारपेठ अत्यंत वेगाने विस्तारत आहे. आगामी २०३४ पर्यंत देशातील आईस्क्रीमचा व्यवसाय तब्बल १ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये ही बाजारपेठ फक्त ₹१४,८०० कोटींवर होती, जी २०२५ मध्ये ₹३१,२७६ कोटी (अवघ्या ५ वर्षांत बाजारपेठ दुप्पट) झाली. आता  २०३० पर्यंतचा ₹६५,७८० कोटी, तर २०३४ पर्यंतचा ₹१.१९ लाख कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

व्यवसाय वाढण्यामागची मुख्य कारणे काय?

लोकांचे वाढते उत्पन्न, वेगाने होणारे शहरीकरण, 'क्विक-कॉमर्स' (१० मिनिटांत डिलिव्हरी करणाऱ्या ॲप्स) चा विस्तार, छोट्या शहरांमधील (Tier-2 आणि Tier-3) बदलती जीवनशैली आणि मजबूत 'कोल्ड चेन इंफ्रास्ट्रक्चर' यामुळे हा व्यवसाय सुसाट धावत आहे. आता आइसक्रीम हे केवळ उन्हाळ्यापुरते मर्यादित न राहता बाराही महिने खाल्ले जाणारे प्रोडक्ट बनले आहे.

'इम्पल्स आइसक्रीम' आणि 'चॉकलेट फ्लेव्हर'ला सर्वाधिक पसंती

चालता-बोलता किंवा अचानक इच्छा झाल्यावर खाल्ल्या जाणाऱ्या आईस्क्रीमला (उदा. कोन, कॅंडी) बाजारात सर्वाधिक, म्हणजेच ५९.६२% पसंती आहे. किराणा दुकानांमधील फ्रीज आणि क्विक-कॉमर्समुळे हे प्रमाण वाढले आहे. एकूण कमाईमध्ये चॉकलेट फ्लेव्हर ३१.०५% हिश्श्यासह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर व्हॅनिला (२८.४२%) दुसऱ्या आणि फ्रूट फ्लेव्हर्स (२४.६३%) तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

देशात 'महाराष्ट्र' अव्वल!

विशेष म्हणजे, आइसक्रीमच्या एकूण विक्रीमध्ये १२% सह महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबई आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमधील मोठा ग्राहकवर्ग, आधुनिक विचारसरणी आणि उत्तम कोल्ड चेन नेटवर्क यामुळे महाराष्ट्राने हे अव्वल स्थान पटकावले आहे.

सरकारची 'PLI' योजना आणि दुधाचे बंपर उत्पादन

केंद्र सरकारने अन्न प्रक्रिया उद्योगाच्या आधुनिकीकरणासाठी पीएलआई योजनेअंतर्गत १०,९०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, ज्याचा फायदा या क्षेत्राला मिळत आहे. तसेच, भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे (वर्ष २०२३-२४ मध्ये २३६.३५ दशलक्ष मेट्रिक टन उत्पादन). त्यामुळे कच्चा माल स्वस्त आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

अंबानींच्या एन्ट्रीने बिघडणार बड्या कंपन्यांचे गणित?

बिझनेस विश्लेषकांच्या मते, मुकेश अंबानी ज्या व्यवसायात उतरतात, तिथे आपली मजबूत पकड निर्माण करतात. नुकतेच सॉफ्ट ड्रिंक मार्केटमध्ये 'कँपा कोला' आणून अंबानींनी कोका-कोला आणि पेप्सीसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची झोप उडवली आहे. आता आइसक्रीम मार्केटमध्ये 'वंतारा क्रीमरी'च्या माध्यमातून त्यांनी पाऊल ठेवल्यामुळे, क्वालिटी वॉल्स, क्रीमबेल, बास्किन रॉबिन्स आणि अमूल सारख्या प्रस्थापित कंपन्यांसमोर मोठे आव्हान निर्माण होणार आहे. 

Web Title : अंबानी की आइसक्रीम बाजार में एंट्री; बड़ी कंपनियों को टक्कर

Web Summary : अनंत अंबानी की 'वंतारा क्रीमरी' ने भारत के बढ़ते आइसक्रीम बाजार में प्रवेश किया, जो 2034 तक ₹1.19 लाख करोड़ तक पहुंचने का अनुमान है। महाराष्ट्र की बिक्री सबसे अधिक है। अमूल जैसे मौजूदा ब्रांडों को कड़ी प्रतिस्पर्धा का सामना करना पड़ेगा। सरकारी सहायता और पर्याप्त दूध उत्पादन से विकास को बढ़ावा मिला है।

Web Title : Ambani Enters Ice Cream Market; Big Brands Face Competition

Web Summary : Anant Ambani's 'Vantara Creamery' enters India's booming ice cream market, projected to reach ₹1.19 lakh crore by 2034. Maharashtra leads sales. Existing brands like Amul face increased competition. Government support and ample milk production fuel growth.