RBI Action: सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) फलटण (सातारा) येथील 'द यशवंत सहकारी बँक' (The Yashwant Sahakari Bank) चा परवाना रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नसणे आणि भविष्यात उत्पन्नाची कोणतीही शाश्वत शक्यता न दिसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
आरबीआयने स्पष्ट केले आहे की, ही बँक 'बैंकिंग विनियमन अधिनियमा'तील काही महत्त्वाच्या तरतुदींचे पालन करण्यात अपयशी ठरली आहे. सद्यस्थितीत ही बँक आपल्या ठेवीदारांचे पूर्ण पैसे परत करण्यासही सक्षम नाही. त्यामुळे काल, १९ मे २०२६ रोजी अधिकृत कामकाज संपल्यानंतर या बँकेचे सर्व बँकिंग व्यवहार पूर्णपणे बंद झाले.
ठेवीदारांना किती रक्कम परत मिळणार?
रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्राच्या सहकार आयुक्त आणि निबंधकांना बँक बंद करण्याचे आदेश जारी करून 'परिसमापक' (Liquidator) नियुक्त करण्याची विनंती केली आहे.
५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार
बँक बंद झाल्यानंतर, प्रत्येक ठेवीदाराला डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत जास्तीत जास्त ५ लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम मिळण्याचा अधिकार आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, या बँकेतील तब्बल ९९.०२% ठेवीदारांना त्यांचे पूर्ण पैसे परत मिळतील. दरम्यान, DICGC ने २० एप्रिल २०२६ पर्यंत अशा प्रकरणांमध्ये १०६.९६ कोटी रुपयांची भरपाई दिली आहे.
१० दिवसांत दुसरा धक्का!
गेल्या १० दिवसांत रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केलेली ही दुसरी सहकारी बँक आहे. यापूर्वी आरबीआयने 'सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँक' चा परवाना देखील अपुरे भांडवल आणि कमाईची साधने नसल्यामुळे रद्द केला होता. त्या बँकेच्या ग्राहकांनाही ५ लाख रुपयांपर्यंतचा क्लेम मिळणार आहे.
