Bank Unions Strike: देशभरातील बँकिंग व्यवहारांवर 27 जानेवारी 2026 रोजी मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. सरकारी, खासगी, विदेशी, ग्रामीण आणि सहकारी बँकांमधील सुमारे आठ लाख कर्मचारी-अधिकारी एकदिवसीय राष्ट्रव्यापी संपावर जाणार आहेत. या संपामुळे देशातील कोट्यवधी ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. दरम्यान, या संपाचे नेमके कारण काय? जाणून घ्या...
संपाची मुख्य मागणी काय?
सोमवार ते शुक्रवार असा 5 दिवसीय कार्य सप्ताह लागू करावा, अशी या सर्व संपकरी बँक कर्मचाऱ्यांची मागणी आहे. या मुद्द्यावर दीर्घकाळापासून चर्चा सुरू असून, Indian Banks’ Association (IBA) कडून हा प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. मात्र, अद्याप यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
युनियनच्या माहितीनुसार, ही मागणी 7 डिसेंबर 2023 रोजी United Forum of Bank Unions (UFBU) आणि IBA यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचा भाग होती. नंतर 8 मार्च 2024 च्या सेटलमेंट आणि संयुक्त नोटमध्येही याचा पुनरुच्चार करण्यात आला होता.
प्रस्तावात काय आहे?
या प्रस्तावानुसार, सोमवार ते शुक्रवार दररोज कामाचा वेळ 40 मिनिटांनी वाढवणे आणि सर्व शनिवार सुट्टी घोषित करणे, अशी योजना मांडण्यात आली आहे. ही मागणी मान्य न झाल्याने बँक युनियनने 27 जानेवारी रोजी देशव्यापी संपाचा निर्णय घेतला आहे.
या संघटनांचा संपाला पाठिंबा
ही राष्ट्रव्यापी हडताल United Forum of Bank Unions यांच्या नेतृत्वाखाली होत असून, त्यात बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नऊ प्रमुख संघटना सहभागी आहेत. त्यामध्ये ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉईज फेडरेशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स यांचा समावेश आहे.
सलग चार दिवस बँका बंद राहण्याची शक्यता
जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात ग्राहकांना बँकिंग व्यवहारांमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सलग चार दिवस बँका बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
24 जानेवारी (शनिवार) - चौथा शनिवार
25 जानेवारी (रविवार) - साप्ताहिक सुट्टी
26 जानेवारी (सोमवार) - प्रजासत्ताक दिन
27 जानेवारी (मंगळवार) - बँक कर्मचाऱ्यांचा संप
या काळात शाखांमधील सेवा ठप्प राहण्याची शक्यता असून, केवळ डिजिटल व्यवहार सुरू राहू शकतात.
ग्राहकांना काय करावे?
बँक युनियनने आणि तज्ज्ञांनी ग्राहकांना आधीच आवश्यक बँकिंग कामे पूर्ण करून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. धनादेश क्लीयरन्स, रोख व्यवहार, पासबुक अपडेट, कर्जाशी संबंधित कामे यासाठी नागरिकांनी आगाऊ नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
