अभिनेता शाहिद कपूरने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. आता तो पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. तेलुगू चित्रपट 'अर्जुन रेड्डी'चा रिमेक 'कबीर सिंग'मध्ये तो दिसणार आहे. या निमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचीत...

- तेजल गावडे

तेलगू चित्रपट 'अर्जुन रेड्डी' तू पाहिलास का आणि या चित्रपटाच्या रिमेकबद्दल काय सांगशील?
'अर्जुन रेड्डी' पाहूनच मी कबीर सिंग चित्रपटात काम करायला तयार झालो. या चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय व दिग्दर्शकाचे काम खूप आवडले. मला चित्रपट खूप वास्तविक वाटला. मला चित्रपट पाहिल्यावर जाणवले की, हा सिनेमा कोणीही पाहू शकतो. तसेच या चित्रपटातील पात्र खूप चॅलेंजिंग वाटले आणि मला अशा चॅलेंजिंग भूमिका करायला खूप आवडतात. त्यामुळेच मी हा चित्रपट स्वीकारला. या चित्रपटातील प्रेमकथा खूप वास्तविक, निर्मळ आहे. या चित्रपटातील पात्रांचा प्रवास खूप इंटेस आहे. त्यामुळे खूप चांगला अनुभव होता. खूप मेहनत व प्रामाणिकपणे हा चित्रपट बनवला आहे.

'कबीर सिंग'च्या भूमिकेची तयारी कशी केलीस?
या चित्रपटात माझे तीन लूक्स आहेत. त्यामुळे प्रत्येक लूकसाठी दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी तयारीसाठी लागला. पहिला लूक ज्यात मी दाढी आणि मोठे केस व वजन वाढवले आहे. तर दुसऱ्या लूकमध्ये तो महाविद्यालयीन काळ दाखवला आहे. तर त्यात मला पंचवीस वर्षांचा दिसण्यासाठी मला दहा ते पंधरा किलो वजन घटवावे लागले. त्यानंतर तिसऱ्या लूकसाठी पुन्हा थोडा बदल करावा लागला. 

या चित्रपटात तू प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रियकराची भूमिका साकारली आहेस, तर अशा प्रेमाबद्दल तुझे काय मत आहे?
प्रेम खरेतर नितळ व नि:स्वार्थी असते. जेव्हा तुम्ही कोणासोबत खरे प्रेम करता तेव्हा तुम्ही त्यांचा विचार स्वतःपेक्षा देखील जास्त करता. तुम्ही आधी त्यांचा विचार करता मग, स्वतःचा. ही एक भावना निर्माण होते. मला वाटते की कबीर सिंगसारखे खऱ्या आयुष्यातही व्यक्ती असतात. आपण सगळेच कधी ना कधी कबीर सिंग सारख्या अवस्थेतून जातो. काही लोकांचा हा काळ जास्त असतो. काही लोक पूर्ण जीवन त्याच आठवणींत राहतात. तर काही लोक त्या अवस्थेतून बाहेर पडून पुढील आयुष्य नव्याने जगण्याचा प्रयत्न करतात. मला वाटते की, प्रत्येक व्यक्तीने कधी ना कधी अशाप्रकारच्या पॅशनेट प्रेमाचा अनुभव घेतला असेल. 

या चित्रपटातील किसिंग सीनबद्दल खूप चर्चा झाल्या, याबद्दल तुझे काय मत आहे?
जेव्हा लोक प्रेमात असतात तेव्हा काय करतात. मला वाटते की प्रेमात किस करणे साहजिकच आहे. मला किसिंग सीन बद्दल असे काही विचित्र वाटले नाही. ही नॅचरल गोष्ट वाटते.

'कबीर सिंग'सारख्या अल्कोहोलिक व अँग्री मॅनची भूमिका स्वीकारताना मनावर दडपण आले नाही का? किंवा या गोष्टींचा आपल्या मुलांवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती वाटली नाही का?
अजिबात नाही. रूपेरी पडद्यापेक्षा मी खासगी आयुष्यात काय करतो, हे जास्त महत्त्वाचे आहे. जर मी सिनेमात फक्त चांगले पात्र करतोय आणि खऱ्या आयुष्यात ड्रग्ज, दारूचे व्यसनात अधीन झालो आहे आणि घरी दररोज भांडणे करतो आहे. तर हे चांगले आहे की ते. एक कलाकार म्हणून मला वेगवेगळ्या व्यक्तिरेखा करायच्या आहेत. 

तुझी सहकलाकार कियारा अडवाणीबद्दल काय सांगशील?
कियाराने खूप चांगले काम केले आहे. तिच्या करियरमधील हा खूप चांगला परफॉर्मन्स आहे. तिच्याशिवाय दुसरा कुणी ही भूमिका इतक्या चांगल्या प्रकारे केली नसती. 

बिझी शेड्युलमधून तू पत्नी व मुलांसाठी कसा वेळ काढतोस?
मला माझ्या पत्नी व मुलांसोबत वेळ व्यतित करायला खूप आवडते. मला कामातून वेळ मिळेल तसा मी जास्तीत वेळ त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. मला वाटते की ते लहान आहेत आणि त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवला पाहिजे. त्यामुळे मी बिझी शेड्युलमधूनदेखील त्यांच्यासाठी वेळ काढतो. त्यांच्यासाठी मी व माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचे आहेत. नात्याला सुरूवाती पासून वेळ दिला तर ते आणखीन घट्ट होत जाते. 

तुझ्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांग?
कबीर सिंगनंतर मी काय करणार आहे, हे मी अद्याप ठरवलेले नाही. माझ्याकडे डिंको सिंग बायोपिकचे राईट्स आहेत. पण अद्याप त्याचे काहीच काम सुरू झालेले नाही. निश्चितच माझा तो पुढील चित्रपट नसेल पण लवकरच त्याच्या कामाला सुरूवात होईल.

Web Title: Shahid Kapoor gave a statement about Kissing Scene in Kabir Singh, pushing you to read the statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.