वडील आणि भाऊ राजकारणात असतानाही सगळ्यांचा अंदाज खोटा ठरवित अभिनयाची वाट निवडणारा अभिनेता म्हणजे रितेश देेशमुख. आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारून त्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. आता त्याचा 'बागी ३' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यानिमित्ताने त्याच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...

- तेजल गावडे

'बागी ३' चित्रपटाबद्दल थोडक्यात सांग?
'बागी ३' ही रॉनी व विक्रम या दोन भावांची गोष्ट आहे. त्यातला एक शक्तीशाली आहे तर दुसरा घाबरट. दोन भावांचे एकमेकांवर किती प्रेम असू शकतं. संकट आल्यावर एकमेकांसाठी ते कोणत्या थराला जाऊ शकतात, हे या चित्रपटात पहायला मिळणार आहे. एक दिवस विक्रम अडचणीत सापडतो. रॉनी त्याला वाचवण्यासाठी कोणकोणत्या अडचणींना सामोरे जातो आणि तो त्याला वाचवतो का, हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

या चित्रपटातील सहकलाकाराबद्दल काय सांगशील?
अंकिता लोखंडे अनुभवी अभिनेत्री आहे. तिने मालिकेतून अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली आहे. त्यानंतर तिने मणिकर्णिका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिच्यासोबत काम करताना अनुभवी कलाकारासोबत काम करतानाचा अनुभव मिळाला. अंकिता, मी व श्रद्धा सेटवर मराठीतच बोलायचो. या दोघींसोबत काम करायला मजा आली. तसेच टायगरबद्दल सांगायचं तर तो अतिशय प्रामाणिक, मेहनती आणि कष्टाळू कलाकार आहे. कितीही अवघड सीन असला तरीदेखील कधीही तो मला जमणार नाही, किंवा मला कंटाळा आला असा म्हणाला नाही. नेहमी शांत व शॉटसाठी तयार असायचा. एखाद्या गोष्टीसाठी किती मेहनत घ्यायची हे त्याच्याकडून शिकायला पाहिजे.

या चित्रपटाचा अनुभव कसा होता?
मोठ्या पातळीवरील अ‍ॅक्शनपटात मी आतापर्यंत काम केले नव्हते. त्यामुळे अ‍ॅक्शन पहायला व करायला मजा आली.

छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवतो आहेस, त्याबद्दल काय सांगशील ?
छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्यासाठी आमची संपूर्ण टीम उत्सुक आहे. हा चित्रपट अशा महान व्यक्तीवर आहे, ज्यांच्यावर फक्त महाराष्ट्रानेच नाही तर संपूर्ण देशाने जीव ओवाळून टाकला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वकांक्षी चित्रपट आहे. तसेच मी व नागराज मंजुळे आणि अजय-अतुल यांसारखे दिग्गज लोक या चित्रपटाशी जोडले गेले आहेत. हे संपूर्ण कलेक्टिव्ह काम असणार आहे. सध्या स्ट्रक्चरवर काम चालू आहे. लवकरच फ्लोअरवर चित्रपट जाईल. मराठी आणि हिंदीमध्ये हा चित्रपट बनवला जाण्याचे निश्चित आहे. पण नंतर आणखीन कोणत्या प्रादेशिक भाषेत चित्रपट बनवायचे हे ठरविले जाईल.

ऐतिहासिक चित्रपट बनवताना कोणत्या गोष्टींचे आव्हान असते?
ऐतिहासिक चित्रपट बनवताना लोकांच्या भावनांसोबतच महान व्यक्तीबद्दल आदर आणि सत्यता या दोन गोष्टींची प्रामुख्याने काळजी घ्यावी लागते.
देशातले बेस्ट फिल्ममेकर नागराज मंजुळे आहेत. त्यांनी उत्कृष्ट असे सिनेमे बनविले आहेत. नागराज, अजय अतुल आणि मी या विषयाकडे प्रेम, आदर, आपुलकी व जिव्हाळ्याने पाहिले आहे. आमच्या सगळ्यांचाच हा जिव्हाळ्याचा विषय आहे. तेवढ्याच आदर, आपुलकी व जिव्हाळ्याने हा चित्रपट बनवण्याचा आमचा मानस आहे.

मराठी चित्रपटांच्या ऑफर्स येतात का?
मराठी चित्रपटाच्या ऑफर्स मला येतात. पण त्या मला तितक्या भावल्या नाहीत. त्यामुळे त्या ऑफर मी स्वीकारल्या नाहीत. माझ्या डोक्यात जे विषय असतात. त्या चित्रपटांची निर्मिती मी स्वतः करतो. मग या चित्रपटात मी काम करतो किंवा नाही करत. त्यात मग 'फास्टर फेणे', 'बालक पालक', 'यलो', 'लयभारी', 'माऊली' या पाच चित्रपटांपैकी मी फक्त दोनच चित्रपटात काम केले आहे.

बऱ्याचदा एखादा चित्रपट किंवा भूमिका अयशस्वी ठरते, त्यावेळी तू त्याच्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतोस?
कुठेतरी आपण चुकलो आहे. ज्या लोकांसाठी आपण चित्रपट बनवितो तो त्यांना आवडला नाही.  प्रेक्षक कधीच चुकीचा नसतो. त्यांच्या विचारावर तुमचे मत जुळते की नाही हे महत्त्वाचे असते. ही गोष्ट स्वीकारली पाहिजे आणि काय चुकलं याचा विचार करून ही चुक दुरूस्त केली पाहिजे.

Web Title: Ritesh Deshmukh told about upcoming Movie Chhatrapati Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.