This 'risk' taken by the Khurana career in life has been successful | आयुष्यमान खुरानाने करिअरमध्ये घेतलेली 'ही' रिस्क यशस्वी ठरली

आयुष्यमान खुरानाने करिअरमध्ये घेतलेली 'ही' रिस्क यशस्वी ठरली

सुवर्णा जैन 
 

आपल्या अभिनयाने रसिकांसह समीक्षकांचीही मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे अभिनेता आयुषमान खुराणा. 'विक्की डोनर' या पहिल्या चित्रपटापासून ते अगदी 'बधाई हो' या चित्रपटापर्यंत त्याच्या प्रत्येक भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतल्या. त्याच्या आजवरील प्रवासाबाबत आयुषमानशी साधलेला  दिलखुलास संवाद. 

'विक्की डोनर' ते 'बधाई हो' या चित्रपटापर्यंत हटके चित्रपट निवडले, रसिकांसह समीक्षकांनाही ते भावले. विक्की डोनरसारखा चित्रपट निवडण्यामागे काय उद्देश होता? 


'विक्की डोनर' या चित्रपटाचा विषय वेगळा होता.अशा विषयाच्या चित्रपटांकडे फारसं गांभीर्याने घेतलं जात नसे. अशा चित्रपटात काम करण्याचाही विचार कुणी करायचं नाही. मात्र मला वाटला हा विषय हटके आहे. यावर कधीच मोकळेपणाने बोललं गेलेलं नाही. त्यामुळे हा चित्रपट करण्याचा निर्णय मी घेतला. त्यावेळी अनेकांना वाटलं की मोठी रिस्क घेत आहे. मात्र हा चित्रपट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला. त्यामुळे मी घेतलेली रिस्क यशस्वी ठरली. म्हणूनच की काय रसिकांसह समीक्षकांनीही माझ्या चित्रपटाबाबतची निवड आवडली असावी. 

चित्रपट निवडताना कोणती गोष्ट विचारात घेतो किंबहुना ती महत्त्वाची वाटते?

मी ज्यावेळी या चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं, त्यावेळी मला काहीतरी हटके करायचं होतं. वेगळं काही तरी रसिकांनाही पसंत पडेल. लोकांनाही वाटलं पाहिजे काहीतरी नवं पाहायला मिळणार आहे. हटके पाहायला मिळेल असा विश्वास लोकांच्या मनात निर्माण झाला पाहिजे. रसिकांच्या पसंतीची पावती, त्यांचा विश्वास आणि प्रेम हेच माझ्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे. सोबतच भारतातच नाही तर देशाबाहेर परदेशातही तुमच्या कामाला पसंती मिळते त्याचा आनंद वेगळा असतो. कलेला कोणतीही बंधनं नसतात. देशाच्या सीमा, भाषा, संस्कृती सारं काही पार करून जेव्हा तुम्ही केलेलं काम रसिकांना भावतं तेव्हा काम करण्याची नवी उमेद मिळते. 

नेहमीच चाकोरीबाहेरचे चित्रपट केले. मात्र कधी कमर्शियल चित्रपट किंवा अॅक्शनपट करावा वाटतो का?

मला प्रत्येक प्रकारचा चित्रपट करायचा आहे. वेगवेगळ्या आव्हानात्मक भूमिका साकारायच्या आहेत. एकच पठडीतल्या भूमिका करण्यापेक्षा रसिकांना काय हवंय, त्यांना काय भावतं, त्यांना काय आवडतं तशा सगळ्या भूमिका करायला आवडेल. मग तो कुठलाही विषय असो, सामाजिक असो, अॅक्शन असो किंवा मग विनोदी विषयाचा चित्रपट असो. जो विषय रसिकांना आवडेल त्यात मला कधीही काम करायला आवडेल. 


अॅक्टिंगमध्ये काम करण्याचा तुझा निर्णय एका व्यक्तीला रुचला नव्हता. त्या व्यक्तीने कानाखाली वाजवली होती. कोण होती ती व्यक्ती आणि काय झालं होतं?
 

हो, माझ्या आजीला मान्य नव्हतं. कदाचित माझ्या आजीलाही अभिनेत्री व्हायचं होतं. तेव्हा तिच्या आजीनंही तिला कानाखाली मारलं असेल (हसत). त्यामुळेच माझ्या आजीनं माझ्या कानाखाली मारलं होतं, जेव्हा तिला कळलं की मला अभिनेता बनायचंय. अभ्यासात मी हुशार होतो, त्यामुळे अभिनयाच्या नादी लागून मी वाया जाऊ नये असं त्यांना वाटायचं. मात्र मला घरातून कधीच प्रोत्साहनाची कमी जाणवली नाही. नाटकं, गायन स्पर्धा यांत सहभाग घेण्यापासून मला कधीही रोखलं गेलं नाही. 

आता मुलांच्या अभिनय क्षेत्रातील करिअरबाबतची पालकांची चिंता तशी राहिली नाही असं म्हणता येईल का?

आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. पूर्वी संधी खूप कमी होत्या. आधीच्या काळात आणि आताचा काळ बराच बदलला आहे. पूर्वी ४ ते ५ आघाडीचे कलाकार असायचे. मात्र आता काळ बदलला आहे. आघाडीच्या १० ते १५ कलाकारांची फौज आहे. बरेच नवे लेखक, दिग्दर्शक आहेत. नवनवीन विषय त्यांचे तयार असतात. तुलनेनं माध्यमांची संख्याही वाढल्याने प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत. तुम्ही कोणतंही प्रोफेशन निवडू शकतात. पालकांचा त्यामुळे विश्वास वाढला आहे. त्यांनाही मुलांच्या भवितव्याची चिंता वाटत नाही. कारण तुमच्यात टँलेंट आणि आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. 

मराठी चित्रपट फॉलो करतो का? मराठीत काम करायला आवडेल का?
 

मराठी चित्रपट फार पाहिले नाहीत. मात्र दोन चित्रपट पाहिलेत एक म्हणजे सैराट आणि दुसरा हरिश्चंद्राची फॅक्टरी. मराठी मला बोलता येत नाही. मात्र समजू शकतो. मराठीत आशयघन चित्रपट बनवले जातात. प्रादेशिक चित्रपटांपैंकी केवळ मराठी, मल्याळम आणि बंगाली भाषांमध्ये विषयाला प्राधान्य दिलं जातं. पंजाबमध्ये तर आजही कथेचा विषय हे न पाहता व्यावसायिक यशाला केंद्रस्थानी ठेवत चित्रपट बनवले जातात. त्यामुळे मराठीत एखाद्या दिग्दर्शकाने आशयघन चित्रपटाची कथा ऐकवली तर त्यात काम करायला नक्की आवडेल. 


स्ट्रगल कुणालाही चुकला नाही. तुला पण सामना करावाच लागला असेल. तर स्ट्रगलचा सामना तू कसा केला?
 

प्रत्येकालाच आपल्या करिअरच्या सुरुवातीला स्ट्रगल चुकलेला नाही. स्ट्रगलला केवळ स्ट्रगल समजून रडत बसलात तर काही खरं नाही.  मी स्ट्रगलचा आनंद घेतला. प्रत्येक वळणावर स्ट्रगलचा बाऊ न करता त्याचा आनंद लुटा. स्ट्रगलच्या कालावधीत प्रत्येक गोष्टीमधून काही ना काही शिका आणि त्यातून तुम्ही स्वतःमध्ये काही ना काही बदल करून घ्या. सातत्याने प्रयत्न करत राहा, हताश होऊ नका आणि यशापासून तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही. कारण मी स्वतःही मुंबईत आलो तेव्हा काम मिळेल की नाही,कुठे राहायचं असे अनेक प्रश्न माझ्यापुढे होते. मात्र कठीण काळात मित्रांनी साथ दिली. त्यांनी सुरूवातीला दिलेल्या प्रोत्साहन आणि मदतीमुळे स्ट्रगलचा आनंद घेत इथवर मजल मारली आहे. 

सोशल मीडियावर तुझ्या शायरी कायम दिसतात. पुस्तक लिहायचा वगैरे विचार आहे का?
हो मला पुस्तक लिहायचं तर आहे. काही चांगली शायरी सुचली की सोशल मीडियावर शेअर करतो. मात्र एवढ्या कमी शायरीत पुस्तक होणार नाही. त्यामुळे रसिकांना काही तरी नवं देण्याचा प्रयत्न करत असतो. मला वाटते तेव्हा नवीन शायरी लिहून ती शेअर करतो. 


सध्या वेबसीरिज हे नवं माध्यम वाढतंय. तुला स्वतःला वेबसीरुजमध्ये काम करायला आवडेल का?

वेबसीरिज करायला नक्की आवडेल. बरेच जण म्हणतात वेबसीरिज हे भविष्य आहे. मात्र माझ्या मते ते भविष्य नसून वर्तमान आहे. कारण वेबसीरिजची व्याप्ती चित्रपटांपेक्षा कित्येक पटीने अधिक आहे. कारण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून वेबसीरिज पाहू शकतो. शिवाय वेबसीरिजमध्ये स्पर्धाही अधिक आहे. बडे कलाकार यांत काम करतायत. त्यामुळे अशा आव्हानात्मक अशा माध्यमात म्हणजेच वेबसीरिजमध्ये काम करायला आवडेल. 


देशात निवडणुकीचं वातावरण आहे. आयुषमानला नवं सरकार कसं असावं असं वाटतं?

देशात असं सरकार यावं जे सर्वसामान्यांचं असेल. देशाला प्रगतीपथावर नेणारं सरकार यावं. अन्न, वस्त्र, निवारा, नोकऱ्या, शिक्षण अशा मूलभूत सुविधा देणारं सरकार यावं. आपला देश कृषीप्रधान देश आहे. बहुतांशी लोक गावात राहतात. त्यामुळे गावांचा विकास करणारं आणि शेतकऱ्यांना न्याय देणारं सरकार यावं. 

मतदानाच्या दिवशी मतदान न करता लोक सुट्टी म्हणून फिरायला जातात. त्यांना काय आवाहन करशील?

आपल्या देशात मतदान सक्तीचं केलं पाहिजे. मतदान केल्यावर सबसिडी मिळेल अशी काही तरी योजना केली पाहिजे तरच लोक सुट्टी एन्जॉय करण्याऐवजी मतदान करतील. मतदान हा तुमचा अधिकार आहे. तुमचा हाच अधिकार वापरून योग्य लोकप्रतिनिधी निवडा आणि तुम्हाला हवं ते सरकार निवडा. मात्र तुम्ही मतदानच केलं नाही तर लोकप्रतिनिधींना शिव्या घालण्याचा तुम्हाला अधिकार नाही. त्यामुळे मतदानाचा हक्क जरूर बजावा. 

Web Title: This 'risk' taken by the Khurana career in life has been successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.