Rajesh Khanna's Wafa: A Deadly Love Story heroine laila khan was murdered, her body was found a year and a half later | राजेश खन्ना यांच्या या नायिकेचा झाला होता खून, दीड वर्षांनी मिळाला होता मृतदेह

राजेश खन्ना यांच्या या नायिकेचा झाला होता खून, दीड वर्षांनी मिळाला होता मृतदेह

ठळक मुद्देराखी सावंतच्या भावाने लैला गायब असल्याची पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर लैलाचे वडील नादिर पटेल, तिची आई सेलिनाचे दुसरे पती आसिफ शेख यांची देखील चौकशी करण्यात आली. पण काहीच निष्पन्न झाले नाही.

राजेश खन्ना यांची मुख्य भूमिका असलेला वफा अ डेडली लव्हस्टोरी हा चित्रपट तुम्हाला आठवतो का? या चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे या चित्रपटाची खरी चर्चा रंगली होती. राजेश खन्ना यांच्यासारख्या सुपरस्टारने अशाप्रकारचे इंटिमेट सीन दिलेच कसे असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. या चित्रपटात लैला खान ही नायिका त्यांच्यासोबत दिसली होती. याच लैला खानविषयी काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

लैला खानचे खरे नाव रेश्मा पटेल होते. तिच्या आईचे नाव सेलिना पटेल असून त्यांनी तीन लग्न केली होती. त्यांचे पहिले लग्न नादिर पटेल सोबत झाले होते. लैला ही नादिर आणि सेलिना यांची मुलगी... वफा या चित्रपटाचे दिग्दर्शन राखी सावंतच्या भावाने केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला होता. या चित्रपटानंतर लैलाला चांगल्या चित्रपटांमध्ये काम मिळाले नाही. त्यामुळे तिने बी, सी ग्रेडच्या काही चित्रपटांमध्ये काम केले. लैलाच्या आईकडे करोडोची संपत्ती होती. त्यामुळे लैलाला चित्रपटात यश मिळत नसल्याने तिने मुंबईतील सगळी संपत्ती विकून दुबईला स्थायिक व्हायचे ठरवले होते. 

लैलाच्या आईचा दुबईला जाण्याचा विचार असताना लैलाने मुनीर खान नावाच्या एका माणसासोबत गुपचूप लग्न केले. चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीवर काही परिणाम होऊ नये म्हणून तिने लग्न सगळ्यांपासून लपवले होते. सगळे काही सुरळीत सुरू असताना दिल्लीमध्ये झालेल्या एका बॉम्ब ब्लास्टमध्ये तिच्या आईच्या नावावर असलेली गाडी वापरण्यात आली असल्याचे पोलिसांच्या चौकशीत कळले आणि तिच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले. कारण पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांच्या लक्षात आले की, मुनीर हा बांगलादेशमधील हरकत उल जिहाद इस्लामिक या संघटनेचा सदस्य आहे. पोलिसांची ही चौकशी सुरू असताना अचानक लैला आणि तिचे संपूर्ण कुटुंब गायब झाले. राखी सावंतच्या भावाने तिला अनेकवेळा फोन केला होता. पण तिने उचलला नाही. तसेच तिच्या ओळखीच्या काही लोकांनी देखील तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. 

राखी सावंतच्या भावाने लैला गायब असल्याची पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर लैलाचे वडील नादिर पटेल, तिची आई सेलिनाचे दुसरे पती आसिफ शेख यांची देखील चौकशी करण्यात आली. पण काहीच निष्पन्न झाले नाही. धक्कादायक म्हणजे सेलिनाचे तिसरे पती परवेज टाक आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबच गायब होते. या घटनेनंतर दीड वर्षांनी एका केसच्या संदर्भात पोलिसांनी परवेज टाकला अटक केले होते. त्यावेळी लैलाबाबत चौकशी केल्यानंतर परवेज पोलिसांना इगतपुरी येथील फार्म हाऊसवर घेऊन गेला. तिथे त्याने लैलासोबत आणखी पाच जणांना मारून गाडले होते.

सेलिना सगळी संपत्ती विकून दुबईला जाणार होती आणि त्यामुळे तिने तिची पॉवर ऑफ एर्टोनी दुसऱ्या पतीला दिली होती. त्याचा परवेजला राग आला होता. यावरून परवेज आणि सेलिनामध्ये जोरदार भांडण झाले होते. त्यामुळे त्याने लैला, सेलिना आणि लैलाच्या भावंडाना मारून स्विमिंग पूलसाठी करण्यात आलेल्या खड्ड्यात पुरले होते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rajesh Khanna's Wafa: A Deadly Love Story heroine laila khan was murdered, her body was found a year and a half later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.