ठळक मुद्देअनुपम खेर सांगतायेत, चित्रपटात आताच्या अनुपमची भूमिका मी स्वतःच साकारू शकतो. केवळ तरुणवयातील अनुपम साकारण्यासाठी एखाद्या तरुण कलाकाराचा विचार मला करावा लागेल.

मुंबईत 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित हॉटेल मुंबई हा चित्रपट असून या चित्रपटात अभिनेते अनुपम खेर एका महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाबाबत त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...

हॉटेल मुंबई हा चित्रपट तुमच्या कारकिर्दीतील 501 वा चित्रपट आहे, तुमच्यासाठी हा चित्रपट किती खास आहे?
26/11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तो भीषण हल्ला आजही आठवला की, अंगावर काटा येतो. या हल्ल्यात अनेक सामान्य लोकांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता इतरांचा जीव वाचवला होता. हॉटेल मुंबई या चित्रपटात ताजमध्ये काम करणाऱ्या लोकांनी, तेथे राहायला आलेल्या लोकांनी एकमेकांना कसे वाचवले हे पाहायला मिळणार आहे. 26/11 चा हल्ला झाला, त्यावेळी मी वांद्रे येथे माझ्या एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो. मुंबईत काय काय सुरू आहे हे सतत मी तीन दिवस टिव्हीवर पाहात होतो. हा चित्रपट प्रचंड इमोशनल चित्रपट असून या चित्रपटात काम करताना आम्ही कोणत्याही प्रकारचा अभिनय करू नये असे चित्रपटाच्या दिग्दर्शकांना वाटत होते. त्यामुळे आमच्यासोबत काही वर्कशॉप घेण्यात आली. तुम्ही अशा एखाद्या ठिकाणावर अडकलात तर तुमची भावना काय असेल असा विचार आम्हाला वर्कशॉर्पच्या दरम्यान करायला सांगितला होता. हा चित्रपट माझ्या कारकिर्दीतील 501 वा चित्रपट असल्याने माझ्यासाठी हा खूप खास आहे. 

हॉटेल मुंबई या चित्रपटात तुम्ही एका शेफची भूमिका साकारत आहात... तुम्हाला खऱ्या आयुष्यात जेवण बनवायला येते का?
बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत असताना मी मुंबईत एकटाच राहायचो. त्यावेळी माझे जेवण मी स्वतःच बनवायचो. मला चांगले जेवण बनवता येते. बुर्जी, दम आलू यांसारखे पदार्थ तर मी खूप छान बनवतो. या चित्रपटात मी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काम करतो असे दाखवण्यात आले आहे. खऱ्या आयुष्यात मी 20-21 वर्षांचा असताना पहिल्यांदा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेलो होतो. त्यावेळी केवळ चहा पिण्याइतकेच माझ्याकडे पैसे होते. मी एका गरीब परिवारातून आलो असल्याने मला आजही पैशांची किंमत आहे. त्यामुळे मी आजही कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर पदार्थाच्या नावासमोर लिहिलेली किंमत पहिल्यांदा पाहातो. 

सोशल मीडियावर तुम्हाला अनेकवेळा ट्रोल केले जाते. ट्रोलिंगविषयी तुमचे मत काय आहे?
सोशल मीडियावरच नव्हे तर खऱ्या आयुष्यात देखील मला अनेकवेळा ट्रोल करण्यात आले आहे. लोकांनी मला ट्रोल केल्यामुळेच मी इथवर पोहोचलो आहे असे मला वाटते. तुम्ही सोशल मीडियाविषयी विचाराल तर मी सोशल मीडियाच्या फायद्यांचा विचार करतो. प्रत्येक गोष्टीतील चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत हे बघायला पाहिजे असे मला वाटते.

तुमच्या आयुष्यावर लिहिण्यात आलेले पुस्तक नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. यानंतर आता तुमच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचा विचार आहे का आणि असल्यास तुमची भूमिका कोणत्या कलाकाराने साकारावी असे तुम्हाला वाटते?
माझ्या आयुष्यावर चित्रपट बनवावा ही माझी नक्कीच इच्छा आहे. या चित्रपटात आताच्या अनुपमची भूमिका मी स्वतःच साकारू शकतो. केवळ तरुणवयातील अनुपम साकारण्यासाठी एखाद्या तरुण कलाकाराचा विचार मला करावा लागेल.

Web Title: Anupam kher revealed while hotel mumbai promotions about there biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.