काँग्रेसच्या नवख्या उमेदवारापुढे सुनील मेंढे यांची सत्त्वपरीक्षाच

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: April 11, 2024 11:49 AM2024-04-11T11:49:03+5:302024-04-11T11:50:23+5:30

काँग्रेसमध्ये घटक पक्षांचा जोर लागेना : भाजपचा भर हेविवेट नेत्यांच्या सभांवर

Sunil Mende's sattva pariksam before the new candidate of Congress | काँग्रेसच्या नवख्या उमेदवारापुढे सुनील मेंढे यांची सत्त्वपरीक्षाच

काँग्रेसच्या नवख्या उमेदवारापुढे सुनील मेंढे यांची सत्त्वपरीक्षाच

गोपालकृष्ण मांडवकर/अंकुश गुंडावार

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांची काँग्रेसचे तरुण आणि नवखे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्याशी लढत आहे. या दोघांच्या लढतीमध्ये बसपा व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासोबतच अपक्ष सेवक वाघाये यांची उमेदवारीही रंग भरणारी ठरली आहे. सुरुवातीला भाजपसाठी एकहाती वाटणारी ही निवडणूक आता मात्र बऱ्याच कारणांनी जड चालली आहे. दिल्लीपासून तर नागपूरपर्यंत संघर्ष करून तिकिटाची लढाई जिंकणाऱ्या सुनील मेंढे यांच्यासाठी सत्त्वपरीक्षाच आहे.

भाजपला येथे विजयाचे गणित आखताना बरीच मेहनत घ्यावी लागत आहे. तशी निवडणूक काँग्रेससाठीही सोपी नाही. भाजपने जुनाच उमेदवार रिपीट केल्याने जनमताची नाराजी असली तरी नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचे वलय काँग्रेसला भेदावे लागणार आहे. भाजपच्या तगड्या व नियोजनपूर्वक प्रचार यंत्रणेपुढे आणि हेवीवेट नेत्यांच्या प्रचार सभांपुढे या नव्या चेहऱ्याचा निभाव लावताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही परीक्षा आहे. अनपेक्षितपणे नवखा उमेदवार दिल्याने त्यांच्यावर सुरुवातीस दिसणारी पक्ष कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासोबतच डॉ. प्रशांत पडोळे यांच्या कोऱ्या कॅनव्हाॅसमध्ये त्यांना रंग भरावे लागत आहेत. या मतदारसंघात बहुजन समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचीही परंपरागत मते आहेत. या दोघांची बेरीज गेल्या निवडणुकीत एक लाखाच्या जवळपास होती. पक्षांतर्गत होणारे जातीय मतविभाजनही या मतदारसंघात महत्त्वाचे ठरणार आहे.

काँग्रेसची प्रचार यंत्रणा नाना पटोले केंद्रित
n मतदानाला ८ दिवस शिल्लक असतानाही काँग्रेसची प्रचार यंत्रणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याभोवतीच फिरत आहे. त्यामुळे घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव दिसत आहे. त्या तुलनेत भाजपची प्रचार यंत्रणा मजबूत आहे. अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल स्वत: मैदानात उतरले आहे.
n नाना पटोले स्वत: प्रचारात गुंतले असले तरी त्यांच्या मर्यादा आहेत. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, खासदार मुकुल वासनिक आणि शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांची वगळता कुण्याही बड्या नेत्याची सभा झालेली नाही. या उलट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा भाजपने यशस्वी केली.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

मागील १५ वर्षात या मतदारसंघात एकही मोठा उद्योग आला नाही. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न कायम आहे. रखडलेला ‘भेल’ प्रकल्प हा प्रचारातील कळीचा मुद्दा आहे.
औद्योगिक विकासातही हा मतदारसंघ बराच मागे आहे. धानाचे विक्रमी उत्पादन होऊनही एकही प्रक्रिया उद्योग नाही. भंडारा जिल्ह्यातील एमआयडीसी ओस आहे. नवे प्रकल्प आणण्यात जनप्रतिनिधी माघारले आहेत.
सिंचन आणि पर्यटनाला वाव असला तरी त्या दृष्टीने प्रयत्न नाहीत. पारंपरिक उद्योगांच्या पुनरुज्जीवनासाठी कसलेही प्रयत्न झाले नाहीत. महामार्गाशी जुळलेला मतदारसंघ असूनही विकास मात्र पोहोचला नाही.

२०१९ मध्ये काय घडले?
सुनील बाबूराव मेंढे    भाजप (विजयी)    ६,५०,२४३
नाना जयराम पंचबुद्धे    राष्ट्रवादी काँग्रेस    ४,५२,८४९ 
विजया राजेश नंदूरकर     बहुजन समाज पार्टी    ५१,४५५
नोटा    -    १०,५२४

गटातटाचा काय       होणार परिणाम?
nअजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांची मतदारसंघावर मजबूत पकड आहे. महायुतीमध्ये ते सोबत असल्याने भाजपला मोठे पाठबळ मिळणार आहे. भाजपसाठी ही जमेची बाजू आहे.
nमहाविकास आघाडीसोबत त्यांचे मित्रपक्ष देखील कामाला लागले असले तरी अद्यापही प्रचार यंत्रणेत सुसूत्रता दिसत नाही. पटोले यांच्या पाठीशी पक्ष असला तरी सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन चालताना उमेदवाराला कसरत करावी लागत असल्याचे दिसते.

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?

वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते     टक्के
२०१४    नानाभाऊ फाल्गूनराव पटोले     भाजप     ६,०६,१२९    ५०.६२%
२००९    प्रफुल्ल मनोहरभाई पटेल    एनसीपी    ४,८९,८१४     ४७.५२%
२००४    शिशुपाल नथ्थू पटले    भाजप    २,७७,३८८    ४०.७६%
१९९९    चुन्नीलाल ठाकूर    भाजप    २,९१,३५५    ४५.८१%
१९९८    प्रफुल्ल मनोहरभाई पटेल    आयएनसी    ३,२४,५४२       ४९.१३%

Web Title: Sunil Mende's sattva pariksam before the new candidate of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.