सोलर पंप ९ महिन्यांपासून बंद, शेतकरी अडचणीत; पाण्याअभावी होतेय धानपिकांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 12:39 IST2025-02-15T12:38:05+5:302025-02-15T12:39:17+5:30
Bhandara : ९ महिन्यांपासून सोलर पंप बंद, तक्रारीनंतरही दखल नाही

Solar pumps closed for 9 months, farmers in trouble; Paddy crops are being damaged due to lack of water
सिल्ली-आंबाडी : तालुक्यातील बोरगावं बुज. येथील अल्पभूधारक शेतकरी निर्मल चतुराम बावनकुळे यांनी शेती सिंचनासाठी प्रधानमंत्री कुसुम योजनेतून सोलर पंप लावले. मात्र सोलर पॅनलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मागील नऊ महिन्यापासून सोलर बंद आहे. कंपनीला वारंवार निवेदन देऊन देखील कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे पाण्याअभावी पिकांचे नुकसान होत आहे.
शेती ही पाण्याशिवाय होऊ शकत नाही. आधुनिक पद्धतीने शेतपिके घेण्यासाठी सबसीडीवर कुसुम सोलर योजना सुरू केली. निर्मल बावनकुळे यांनी ४ वर्षांपूर्वी शेतावर जे. के. कंपनीचे पाच वर्ष वॉरंटी असलेले सोलर पंप लावले. पाण्याच्या भरोशावर विविध पिकाची लागवड केली. आता शेतात नगदी भाजीपाला लावला आहे.
दाद मागावी तरी कुठे ?
मागील नऊ महिन्यापासून सोलर पंप बंद असून कंपनीला वारंवार निवेदन दिले. मात्र अद्याप कंपनीचा एकही प्रतिनिधी सोलर दुरुस्तीसाठी आला नसून केवळ याला फोन करा, त्याला फोन करा असा चालढकलपणा सुरू आहे. सोलर घेण्यापूर्वी कंपनीचे एजंट चकरा मारतात. मात्र एखादा विकून झाले की शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दाद कुठे मागावी? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
"पाण्याअभावी शेतातील हिरवा भाजीपाला करपण्याच्या मार्गावर असून उन्हाळी धानपिकाची रोपेही पिवळी पडली. सोलर कंपनीचे प्रतिनिधी प्रतिसाद देत नाही. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी काय करावे? सुचत नाही."
- निर्मल बावनकुळे, शेतकरी बोरगाव