भंडारा महिला सामूहिक अत्याचार प्रकरण : लाखनीच्या पोलीस उपनिरीक्षकासह दोन जण निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2022 18:09 IST2022-08-08T17:45:58+5:302022-08-08T18:09:05+5:30
कर्तव्यात बेजबाबदारपणा, पीडित महिलेकडे दुर्लक्ष करणे लाखनी पोलिसांना चांगलेच भोवले आहे.

भंडारा महिला सामूहिक अत्याचार प्रकरण : लाखनीच्या पोलीस उपनिरीक्षकासह दोन जण निलंबित
भंडारा : ३५ वर्षीय महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचारप्रकरणात हयगय केल्याप्रकरणी लाखनी पोलीस स्थानकातील २ पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी पोलीस उपनिरीक्षकासह दोघांना तडकाफडकी निलंबित केले.
पोलीस उपनिरीक्षक दिलीपकुमार घरडे व सहायक पोलीस उपनिरीक्षक लखन उईके अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर महिला पोलीस कर्मचारी खोब्रागडे यांची भंडारा मुख्यालयात बदली करण्यात आली.
गोंदिया जिल्ह्यात अत्याचार झाल्यानंतर पायी फिरणाऱ्या महिलेला महिला पोलीस पाटलाने मदत करुन लाखनी ठाण्यात पाठविले होते. परंतु पोलिसांनी हलगर्जीपणा केला. त्यामुळे ती महिला पहाटे ठाण्यातून निघून गेली आणि भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह येथे दुसऱ्यांदा अत्याचार झाला. याप्रकरणी पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी चौकशीचे आदेश दिले. भंडाराचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील आणि पवनीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांनी सोमवारी ठाण्यात कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली. दरम्यान पोलीस अधीक्षकांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले. यामुळे एकच खळबळ उडाली.
दरम्यान, दरम्यान, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ३५ वर्षीय महिला व १३ वर्षीय मुलीवर उपचार सुरू आहेत. सोमवारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या दोन्ही पीडितांना भेटून प्रकृतीची चौकशी केली. चाकणकर म्हणाल्या, ३५ वर्षीय पीडिता बोलण्याचा स्थितीत नाही. यामुळे तिसरा आरोपी अद्यापही मोकाट आहे. १३ वर्षीय चिमुकली अद्यापही ‘शॉक’मध्ये आहे. अधीक्षकाला अटक करण्यात आली आहे. तर ५ वर्षीय चिमुकलीच्या हत्या प्रकरणात आई-वडिलांना अटक करण्यात आली आहे. या तिन्ही घटनाबाबत राज्य महिला आयोग सुमोटो तक्रार दाखल करणार आहे. लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी खटला ‘फास्ट ट्रॅक कोर्टात’ चालविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.