Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 11:00 IST2025-09-15T10:59:34+5:302025-09-15T11:00:04+5:30
Navratri 2025: Tulja Bhavani Manchaki Nidra 2025 Date: नवरात्र सुरू होण्यापूर्वी आई तुळजाभवानीला मंचकी निद्रा देण्याची प्रथा का, कशासाठी आणि कशी सुरू झाली ते जाणून घ्या.

Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
यंदा २२ सप्टेंबरपासून नवरात्र (Navratri 2025) सुरू होत आहे. त्यापूर्वी भाद्रपद अष्टमीला आई तुळजाभवानीची घोर मंचकीनिद्रा(Tuljabhavani Manchaki Nidra 2025) सुरू होते आणि भाद्रपद अमावस्येला(Bhadrapad Amavasya 2025) निद्रा समाप्त होते. तुळजापूरची तुळजाभवानी ही एकमेव चलमूर्ती असल्याने नवरात्रोत्सव सुरु होण्याआधी आणि संपल्यावर तिला विश्रांती देण्यात येते. ही विश्रांती का? कशासाठी आणि किती दिवस त्याबद्दल जाणून घेऊ.
मंचकी निद्रा प्रथेबद्दल :
मंचकी निद्रा अर्थात देवीची शांत झोप. कशासाठी? तर ऊर्जा संपादन करण्यासाठी! महिषासुराचा वध करायचा तर ऊर्जा कार्यान्वित करायला हवी. युद्धासाठी देवी भगवती शस्त्र घेऊन सज्ज झाली आहे. पण पूर्ण शक्तीनिशी लढा द्यायचा तर अंगी बळ असावे लागते, यासाठी पुरेशी विश्रांतीदेखील मिळायला हवी. अर्थात हा झाला मानवी विचार! भक्तांचा भोळा भाव! ज्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या, त्या देवालाही मिळायला हव्यात; याच दृष्टिकोनातून सुरु झालेली प्रथा म्हणजे मंचकी निद्रा! अन्यथा देवी हेच शक्ती स्वरूप आहे, निद्रा, चैतन्य, छाया, शांती ही तिचीच रूपं आहेत, असे असताना तिला वेगळ्या विश्रांतीची गरज नाही. पण भक्तांनी देवीलाही विश्रांती मिळावी, जगाचा भार सांभाळून तिलाही थकवा येत असावा या विचाराने ही प्रथा सुरु केली असावी. या प्रथेचे स्वरूप जाणून घेऊ.
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
मंचकी निद्रा : तुळजाभवानी देवीला वर्षभरात तीन वेळा, अशी एकूण २१ दिवस मंचकी निद्रा दिली जाते. यामध्ये शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी ८ दिवस, सीमोल्लंघनानंतर ५ दिवस व शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वी ८ दिवस देवी मंचकी निद्रा दिली जाते. शारदीय नवरात्रोत्सव हा देवीने महिषासुर नावाच्या राक्षसाशी दिलेला नऊ दिवसांचा लढा आणि त्याचे मर्दन करून केलेल्या सीमोल्लंघनाचा उत्सव आहे. यासाठी देवीला दिलेला हा विश्रांती काळ आहे. तर पौषात येणारी शाकंभरी नवरात्र हा संपूर्ण सृष्टीला फळं, पालेभाज्या, सुजलाम सुफलाम करण्याचा काळ! सर्व लेकरांचे पोट भरून आई जशी थकते, तशी ही अन्नपूर्णादेखील थकत असेल, या विचाराने तिला विश्रांती दिली जाते.
यंदा होणार्या उत्सवाची रूपरेषा:
श्री तुळजा भवानी प्रसन्न! श्रीतुळजाभवानी मातेची घोर निद्रा प्रारंभ रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी आई जगदंबेच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाला आहे. सायंकाळी ७ वाजता आई साहेबांचा पंचामृत अभिषेक झाला. त्यानंतर ८ वाजता भोपी पुजाऱ्यांच्या घरच्या मानाच्या आरत्या आईसाहेबांना ओवाळल्या गेल्या व त्यानंतर देवीजींच्या अंगाला भांडारा लाऊन भोपी जगदंबा मातेच्या मूर्तीस खांद्यावर घेऊन चांदीच्या पलंगावर निद्रेसाठी घेऊन जातात. या निद्रेस घोर निद्रा असे म्हणतात. ही निद्रा महिष्यसुरासोबत युद्ध करण्याआगोदर दिली जाते. जगामध्ये व भारतात अशी एकमेव चल मुर्ती आहे. जी की वर्षातून २१ वस पलंगावर जाऊन निद्रा घेते. हि परंपरा फक्त तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर येथे आहे. या निद्रेचा कालावधी १४ ते २२ सप्टेंबर पर्यंत आहे.
मंचकी निद्रेच्या काळात देवीची भेट घेऊ नये; कारण....
साधी गोष्ट आहे, कोणी आपली झोपमोड केली तर आपली चिडचिड होते, तशी देवीचीही झोपमोड होऊ नये म्हणून वर दिलेल्या काळात तिची भेट घेऊ नये. तिला पूर्ण विश्रांती घेऊ द्यावी, जेणेकरून ती जागी झाल्यावर तिच्या रूपाने सौख्य, समाधान, आनंद परत येईल.
श्रद्धेची ही रूपं अतिशय सुंदर आणि मानवातील सहृदयता जागृत करणारी आहेत. थंडीत देवाला शाल, स्वेटर घालणे, देवीची ओटी भरणे, बाप्पाचा पाहुणचार करणे, दत्त गुरूंची पालखी वाहणे, नर्मदेला साडी अर्पण करणे, सूर्याला अर्घ्य देणे, चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवणे, घटस्थापनेला पंचमहाभूतांची पूजा करणे, या सगळ्या गोष्टी श्रद्धाळू मनाच्या निदर्शक असल्या तरी त्यातून माणुसकी जागृत ठेवण्यासाठी लागणारे संवेदशील मन दिसून येते. जे सोपस्कार देवासाठी तेच अन्य भूतमात्रांसाठी करून प्रत्येक जीवात्म्याचा सत्कार करणे हा मानवी मनावर घातलेला सुंदर संस्कारच म्हटला पाहिजे!