१० कोटी भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; २०२४ मध्ये काशी, मथुरा येथे किती पर्यटक आले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 18:30 IST2025-01-28T18:27:50+5:302025-01-28T18:30:09+5:30
Ayodhya Kashi Mathura: २०२४ मध्ये अयोध्येतील राम मंदिर भाविक, पर्यटकांची सर्वांत पहिली पसंती ठरली आहे.

१० कोटी भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; २०२४ मध्ये काशी, मथुरा येथे किती पर्यटक आले?
Ayodhya Kashi Mathura: २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील भव्य राम मंदिराचे लोकार्पण करून रामललाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा अद्भूतपूर्व केला. यानंतर अयोध्येत भाविकांचा जो महासागर उसळला आहे, त्याला किंचितही ओहोटी लागलेली नाही. महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने सुमारे २४ तासांत २५ लाख भाविक अयोध्येत रामललाचे दर्शन घेण्यासाठी आले. संपूर्ण २०२४ मध्ये अयोध्या हेच भाविक, पर्यटकांचे सर्वांत आवडते ठिकाण झाले. याशिवाय काशी आणि मथुरा या ठिकाणांनाही मोठ्या प्रमाणात भाविकांनी भेट दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, धार्मिक पर्यटनाच्या क्षेत्रात उत्तर प्रदेशने प्रचंड मोठी झेप घेतली आहे. उत्तर प्रदेशात येणाऱ्या पर्यटकांसाठी राम मंदिर पहिली पसंती आहे. पर्यटन विभागाने जाहीर केलेल्या २०२४ च्या आकडेवारीनुसार, २०२३ च्या तुलनेत १०.६८ कोटी अधिक पर्यटकांनी अयोध्येला भेट दिली. याशिवाय काशी, मथुरा आणि प्रयागराज येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. २०२४ मध्ये ६५ कोटींहून अधिक लोकांनी पर्यटन आणि तीर्थाटन करण्यासाठी उत्तर प्रदेशला भेट दिली. विशेष म्हणजे या काळात २३ लाख परदेशी पर्यटकही आले.
२०२४ मध्ये काशी, मथुरा येथे किती पर्यटक आले?
२०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये उत्तर प्रदेशात येणाऱ्या भाविक, पर्यटकांच्या संख्येत सुमारे १७ कोटींनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या एका वर्षात परदेशी पर्यटकांच्या संख्येत सुमारे ७ लाखांची वाढ झाली आहे. २०२४ मध्ये एकूण ६४,९०,७६,२१३ पर्यटकांनी राज्यात भेट दिली होती. तर २०२३ मध्ये एकूण ४८,०१,२७,१९१ पर्यटकांनी भेट दिली होती. अशा प्रकारे एका वर्षात १६,८९,४९,०२२ रुपयांची वाढ झाली. श्रीराम जन्मभूमीत रामलला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. २०२४ मध्ये एकूण १६ कोटी ४४ लाख १९ हजार ५२२ भाविक तेथे पोहोचले होते. तर २०२३ मध्ये ही संख्या ५ कोटी ७५ लाख ७० हजार ८९६ होती. २०२४ मध्ये ११ कोटी ९७ लाख भाविक काशीला आले होते, तर २०२३ मध्ये एकूण १० कोटी १८ लाख ६७ हजार ६१८ भाविक आले होते. पर्यटकांच्या संख्येत ८२ लाख ३० हजार १२५ ची वाढ नोंदवण्यात आली आहे. या वर्षी ९ कोटी ८१ लाख भाविक मथुरेला पोहोचले, तर २०२३ मध्ये ७ कोटी ७९ लाख २७ हजार २९९ भाविक पोहोचले होते. अशा प्रकारे १ कोटी २१ लाख ५४ हजार ४८९ पर्यटकांची वाढ झाली आहे. २०२४ मध्ये ५ कोटी १२ लाख ६२ हजार ८०६ पर्यटकांनी प्रयागराजला भेट दिली, तर २०२३ मध्ये ५ कोटी ६७ लाख पर्यटकांनी भेट दिली होती. अशा प्रकारे पर्यटकांची संख्या ५लाख ९१ हजार १८४ ने वाढली.
दरम्यान, २०२४ मध्ये परदेशी पर्यटकांच्या आगमनात आग्रा अव्वल स्थानावर होता. येथे एकूण १ कोटी ७७ लाख ७५ हजार ५६१ पर्यटक आले. त्यापैकी १४ लाख ६५ हजार ८१४ परदेशी पर्यटक होते. एकूण ११ कोटी ९७७४३ भाविक वाराणसीला आले होते, त्यापैकी ३०९९३२ पर्यटक परदेशी होते. कुशीनगरमध्ये एकूण २२ लाख ४२९१३ पर्यटक आले, ज्यात २ लाख ५१,२५१ परदेशी पर्यटकांचा समावेश होता. २०२४ मध्ये एकूण ९ कोटी ८१७८८ भाविकांनी मथुरा येथील कृष्ण नगरीला भेट दिली. त्यापैकी १ लाख ३६ हजार ७९ विदेशी पर्यटक होते. एकूण १६ कोटी ४४ लाख १९,५२२ भाविक अयोध्येत पोहोचले, त्यापैकी २६,०४८ परदेशी पर्यटक होते.