अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 17:35 IST2025-09-05T17:34:38+5:302025-09-05T17:35:42+5:30

Anant Chaturdashi 2025: ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर धनिष्ठा नक्षत्र आहे, हे नक्षत्र पुढील राशींना धन संपत्ती, विपुलता प्रदान करेल.

Anant Chaturdashi 2025: Bappa will shower infinite blessings on these zodiac signs; Chances of buying a house, car, land along with financial gains | अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग

अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग

६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. यादिवशी दहा दिवसांचा पाहुणचार संपवून बाप्पा आपला निरोप घेतो. निघताना सगळ्या गणेशभक्तांना भरभरून आशीर्वाद देतो. यातही ग्रहस्थितीची साथ लाभल्याने ज्योतिष शास्त्रानुसार अनंत चतुर्दशीला(Anant Chaturdashi Astro 2025) 'या' राशींवर बाप्पाची विशेष कृपा होणार आहे आणि आगामी काळात या राशींना धनलाभाची तसेच  घर, जमीन, गाडी घेण्याची संधी आहे. 

शनिवार ६ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा रात्री १.४१ मिनिटांनी सुरु होणार आहे. यादिवशी अनंताचे अर्थात विष्णू पूजेचे व्रत केले जाते. या दिवशी रात्री १० वाजून ५६ मिनिटांपर्यंत धनिष्ठा नक्षत्र आहे, हे नक्षत्र धन संपत्ती, विपुलता यांचे कारक आहे. हे नक्षत्र तेजस्वीपणा, दृढनिश्चय आणि कुशल प्रयत्न आणि शिस्तीद्वारे समृद्धी प्रकट करण्याची क्षमता देते. याचा लाभ पुढील राशींवर होऊन आगामी काळ सुखकारक ठरणार आहे. 

मेष: अडलेल्या कामांना चालना मिळेल. धनवृद्धी होईल. कमाईचे नवे मार्ग सापडतील. आरोग्याची काळजी घ्या. पथ्य पाणी सांभाळा. कौटुंबिक सदस्यांकडून आनंदाची बातमी समजेल. क्षेत्र कोणतेही असो जपून पावले टाका. हा काळ लाभाचा आणि इच्छापूर्तीचा आहे. कसून प्रयत्न करा, यश मिळेल. येत्या काळात वाहन खरेदीचे योग आहेत. 

वृषभ: नोकरदारांसाठी पगार वाढ तसेच पद वाढीची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यावसायिकांनी व्यवहार जपून करावेत. मात्र नवीन परिचयातून लाभाच्या संधी आहेत. डोळसपणे परिस्थिती हाताळा. कुटुंबसौख्य लाभेल. महादेवाच्या कृपेने आर्थिक बाबतीत वृद्धी होईल आणि मनात दडवून ठेवलेल्या इच्छा आता हळू हळू पूर्ण होतील. एखादी खरेदी आनंद देणारी ठरेल. 

मिथुन: बिघडलेली नाती पूर्ववत होतील. मतभेद, वादविवाद विसरून नात्यांमध्ये एकोपा निर्माण होईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. काही कटू आठवणी सोडून देण्यात शहाणपण ठरेल. आगामी काळ आनंदाचा असणार आहे, खुल्या मनाने स्वागत करा. नोकरी व्यवसायासाठीदेखील हा काळ अनुकूल असेल. मुलांकडून चांगल्या बातम्या कळतील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अडलेली कामे मार्गी लागतील. घराचे स्वप्न पूर्ण होईल. 

कर्क: नोकरीत पगारवाढ होण्याची शक्यता आहे, एवढेच नाही तर पदोन्नतीही होऊ शकते. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यावसायिकांना नाव, प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक वृद्धी होईल. आरोग्य सुधारेल. मात्र कोणाशीही तुटक वागून कटुता घेऊ नका. काही काळ संयम ठेवा, गोष्टी मनासारख्या घडू लागतील. सध्याचा काळ गुंतवणुकीसाठी योग्य नाही, दिवाळीत मनपसंत खरेदी करा. 

सिंह: आरोग्य सांभाळा. स्वच्छ, सात्त्विक आणि शक्यतो घरचे अन्न खा. पैसे जपून वापरा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. बाप्पाच्या कृपेने आगामी काळात धनवृद्धी होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. कष्ट करण्यात कुचराई करू नका. सकारात्मकतेने पुढे जा, यशस्वी व्हाल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. मनासारखा जोडीदार मिळेल. कुटुंबसौख्य लाभेल.

कन्या: गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम आहे. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. पैसे जमवण्यापेक्षा वाढवण्यावर लक्ष द्या. अतिरिक्त खर्च टाळा. कलाक्षेत्रातील लोकांना आगामी काळात सुवर्ण संधी मिळेल. लेखक, तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांसाठीही हा काळ परिस्थितीत आमूलाग्र बदल घडवून आणेल. जोडीदाराची साथ लाभेल. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पथ्य पाणी सांभाळा.

तूळ: तुमचे संतुलित वर्तन तुम्हाला उत्कर्षाच्या मार्गावर नेणारे ठरेल. मात्र लोकांची पारख करताना चुकभुल करू नका. अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल. जोडीदाराचा सल्ला घ्या. आवडत्या क्षेत्रात काम करत राहा, प्रसिद्धी योग आहे. घरातील कलह, मनमुटाव दूर होऊन घरातल्या सदस्यांमध्ये एकोप्याचे, आनंदाचे वातावरण राहील.

वृश्चिक: व्यापारात नफा देणारा काळ आहे. काही अडचणी येतील पण त्यावर मात करण्याची शक्तीही मिळेल. उत्पन्नाचे साधन वाढेल. नोकरदारांना अनपेक्षित पगारवाढ मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल. घरात पाहुण्यांचे आगतस्वागत होईल. उत्साहाचे वातावरण राहील. मात्र आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नियमित व्यायाम आणि सकस आहाराची जोड देणे आवश्यक आहे. वाहन खरेदी लाभदायी ठरेल. 

धनु: वैवाहिक जीवन आनंददायी होईल. जमिनीचे व्यवहार पार पडतील, आर्थिक लाभ होतील. अनुभवी लोकांच्या मदतीने आर्थिक गुंतवणूक करा. सरकारी कामांमध्ये दिरंगाई करू नका. जोडीदाराचा सल्ला घ्या. वादाचे प्रसंग उद्भवले असता मौन धारण करा, अन्यथा नात्यात फूट पडू शकते. मित्रांचे, सहकाऱ्यांचे सहकार्य लाभल्यामुळे कामाचा भार हलका होईल.

मकर: बाप्पाच्या कृपेने आगामी काळ इच्छापूर्तीचा आहे. वाहनखरेदी तथा नवीन जागेची खरेदी करता येईल. अडलेली कामे मार्गी लागतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. पोटाचे विकार होऊ शकतात. पथ्य पाणी सांभाळा. शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्या लोकांना करिअरमध्ये नवी उंची गाठता येईल. अपेक्षांचे ओझे कमी केले तर हा काळ कुटुंबसौख्य देणारा ठरेल.

कुंभ: नोकरदार तसेच व्यावसायिकांसाठी हा काळ बुद्धीचातुर्य वापरण्याचा आहे. तरच आर्थिक लाभ होईल आणि सर्वांगीण विकास होईल. तीर्थक्षेत्री जाण्याची योजना आखली जाईल. घरात एखादे मंगलकार्य घडेल. आईच्या तब्येतीची काळजी वाटेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. गुंतवणुकीसाठी हा काळ उचित नाही, त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. जोडीदाराशी प्रेमळ संबंध प्रस्थापित होतील.

मीन: मनाला शांतता, समाधान लाभेल. केलेल्या कामाची पावती मिळेल. नोकरी व्यवसायात आर्थिक वृद्धी होईल. बोलताना सांभाळून बोला. गैरसमज टाळा. आवडत्या क्षेत्रात नवीन उंची गाठता येईल. अडलेले व्यवहार मार्गी लागतील. वाहन खरेदी तथा नवीन वस्तूंची खरेदी लाभदायक ठरेल. कुटुंबसौख्य लाभेल. जोडीदाराशी मतभेद झाले तरी वाद टाळा, एकमेकांना समजून घेत सबुरीने वागा.

Web Title: Anant Chaturdashi 2025: Bappa will shower infinite blessings on these zodiac signs; Chances of buying a house, car, land along with financial gains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.