बीडमध्ये मतांचा वाढला टक्का अन् भाजपच्या पंकजा मुंडेंना बसला धक्का

By सोमनाथ खताळ | Published: June 7, 2024 12:02 PM2024-06-07T12:02:39+5:302024-06-07T12:04:21+5:30

बीड, परळीने दोघांनाही तारले : आष्टी, गेवराईने पंकजा मुंडेंचे गणित हुकवले

vote percentage increased in beed and bjp pankaja munde defeat in lok sabha election 2024 | बीडमध्ये मतांचा वाढला टक्का अन् भाजपच्या पंकजा मुंडेंना बसला धक्का

बीडमध्ये मतांचा वाढला टक्का अन् भाजपच्या पंकजा मुंडेंना बसला धक्का

सोमनाथ खताळ, बीड : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानाचा टक्का पावणेचारने वाढला होता. तो कोणाला धक्का देणार ? याचे तर्कवितर्क लावले जात होते. परंतु, या वाढलेल्या टक्क्याने महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनाच धक्का दिला. तर, महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांना लाभ झाला. या दोन्ही उमेदवारांना परळी व बीड मतदारसंघाने सर्वाधिक लीड दिली. तर, आष्टी व गेवराई येथून अपेक्षेप्रमाणे लीड न मिळाल्याने पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.

जिल्ह्यात १३ मे रोजी मतदान झाले. २१ लाख ४२ हजार पैकी १५ लाख मतदारांनी आपला हक्क बजावला होता. याचा टक्का ७०.९२ एवढा होता. हाच टक्का २०१९ साली ६६ होता. यावेळी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह होता. तसेच राजकीय घडामोडी देखील झाल्याने मतांचा टक्का वाढणार, असा विश्वास प्रशासनाला होता. त्याप्रमाणे ३.७५ एवढा वाढलेला टक्का कोणाला धक्का देणार, याची चर्चा सुरू झाली होती. उमेदवारांसह समर्थकांनीही विधानसभानिहाय गणिताची जुळवाजुळव केली होती. परंतु, यात अनेकांचा अंदाज चुकला. यावेळी जातीय राजकारण झाल्याने पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला. बजरंग साेनवणे यांची २०१९ रोजी खासदार होण्याची हुकलेली संधी २०२४ मध्ये पूर्ण झाली.

आष्टीत सर्वाधिक मतदान

जिल्ह्यात सर्वात जास्त ७४ टक्के मतदान हे आष्टी मतदारसंघात झाले. हा मतदारसंघ कायम भाजपला अनुकूल राहिलेला आहे. २०१९ च्या निवडणुकीतही डॉ. प्रीतम मुंडे यांना सर्वात जास्त लीड याच मतदारसंघातून होती. यावेळी मात्र या ठिकाणी युतीचे दोन आमदार आणि एक माजी आमदार अशी फौज असतानाही केवळ ३२ हजारांचीच लीड मिळाली. प्रत्यक्षात या ठिकाणाहून ६० हजारांपेक्षा अधिक लीड मिळेल, असा विश्वास उमेदवार आणि महायुतीला होता.

बीडमध्ये कमी मतदान

जिल्ह्यात सर्वात कमी ६६ टक्के मतदान हे बीड विधानसभा मतदारसंघात झाले. या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे आमदार आहेत. या ठिकाणी बजरंग सोनवणे यांना जिल्ह्यातील सर्वाधिक ६१ हजार मतांची लीड झाली. हीच लीड पंकजा मुंडे यांचा पराभव करण्यात सोनवणे यांना लाभदायक ठरली.

फौज सोबत असतानाही पराभव

पंकजा मुंडे यांच्यासोबत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह आ. सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, आ. नमिता मुंदडा, आ. प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे अशी फौज होती. सोबत डॉ. प्रीतम मुंडे या सलग दोन वेळा खासदार राहिलेल्या नेत्याही होत्या. त्या तुलनेत सोनवणे यांच्याकडे केवळ संदीप क्षीरसागर यांच्या रूपाने एकमेव आमदार होता. एवढी मोठी फौज असतानाही पंकजा यांना पराभव पत्करावा लागला. असे का झाले, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ महायुतीला आली आहे.

कोणत्या मतदारसंघात कोणाला लीड?

परळी, आष्टी या मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना लीड मिळाली. बीड, गेवराई आणि केजमधून साेनवणे यांना लीड मिळाली. माजलगाव मतदारसंघात दोघेही बरोबरीत चालले. येथे पंकजा यांना ९३५ मतांची लीड घेता आली.

विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारी

गेवराई ७१.४३
माजलगाव ७१.६१

बीड ६६.०९
आष्टी ७४.७९

केज ७०.३१
परळी ७१.३१

एकूण ७०.९२

अशी आहे मतदारसंघनिहाय आकडेवारी

मतदार संघ - पंकजा मुंडे - बजरंग सोनवणे - लीड कोणाला?

गेवराई - ९५४०९ - १३४५०५ - ३९०९६ (बजरंग सोनवणे)
माजलगाव - १०५६४८ - १०४७१३ - ९३५ (पंकजा मुंडे)

बीड - ७७५८३ - १३९२६४ - ६१६८१ (बजरंग सोनवणे)
आष्टी - १४५२१० - ११२९८९ - ३२२२१ (पंकजा मुंडे)

केज - १०९३६० - १२३१५८ - १३७९८ (बजरंग सोनवणे)
परळी - १४१७७४ - ६६९४० - ७४८३४ (पंकजा मुंडे)

टपाली मतदान - २०४८ - १४१८ - ६३० (पंकजा मुंडे)
एकूण - ६७७३९७ - ६८३९५० - ६५५३ (बजरंग सोनवणे विजयी)

Web Title: vote percentage increased in beed and bjp pankaja munde defeat in lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.