जातीयवाद्यांवर ‘एसआयडी’ची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 00:18 IST2019-04-07T00:14:18+5:302019-04-07T00:18:59+5:30
निवडणूक काळात स्वत:च्या फायद्यासाठी राजकारण करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर राज्य गुप्त वार्ता (एसआयडी) नजर ठेवून आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनूसार जिल्ह्यात परळी व आष्टी हे दोन तालुके सध्या आघाडीवर आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत अचानक भेटी देऊन गुप्त आढावा घेतला जात आहे.

जातीयवाद्यांवर ‘एसआयडी’ची नजर
बीड : निवडणूक काळात स्वत:च्या फायद्यासाठी राजकारण करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर राज्य गुप्त वार्ता (एसआयडी) नजर ठेवून आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनूसार जिल्ह्यात परळी व आष्टी हे दोन तालुके सध्या आघाडीवर आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत अचानक भेटी देऊन गुप्त आढावा घेतला जात आहे.
बीड जिल्ह्यातील राजकारण नेहमीच राज्याचा विषय बनते. येथील एक घटना राष्ट्रीय स्तरावरची चर्चा होते. त्यातच सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. याच अनुषंगाने यंत्रणा कामाला लागली आहे. निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी त्यांचे सर्वस्तरातून प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनातील सर्वच विभाग आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. याच निवडणुकीच्या अनुषंगाने आता राज्य गुप्त वार्ताही सक्रीय झाली आहे. जिल्ह्यात कोठे काय घडते, कोण कारणीभूत आहे, कारण काय, याची माहिती त्यांच्याकडून घेत आहेत.
दरम्यान, परळी व आष्टी तालुक्यात सार्वाधिक जातीय तेढ निर्माण केला जात असल्याचा एसआयडीचा अहवाल आहे. या तालुक्यांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांची जास्त नजर आहे. त्यापाठोपाठ गेवराई आणि केजचा क्रमांक लागतो. माजलगाव सुद्धा एसआयडीच्या लिस्टवर आहे. इतर तालुक्यांमध्ये मात्र शांतता असल्याचे सांगण्यात येत आहे.
परळी, धर्माळा प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांकडे
नुकतेच परळीतील खून प्रकरण व केज तालुक्यातील धर्माळा हल्ला प्रकरण चर्चेला आले. काहींनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकल्यामुळे त्याच्या खाली जातीय तेढ निर्माण करणाºया कॉमेंट्स आल्या. या सर्वांवर एसआयडीने नजर ठेवून माहिती काढली आहे. हे कोणामुळे झाले, पोस्ट कोणी टाकली, त्याखाली कॉमेंट्स कोणी केल्या, याची सर्व माहिती एसआयडीने हस्तगत केल्याचे सूत्रांकडून समजते. या सर्व घटनेचे आढावा घेऊन गोपनिय अहवाल अपर पोलीस महासंचालकांना पाठविल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.
‘त्या’ नेत्यांच्या हालचालींवर लक्ष
पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी शेकडो आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या. यामध्ये बहुतांश लोक हे राजकीय आहेत. एसआयडीने कारवाया केल्या नसल्या तरी निवडणुक काळात उपद्रव करणाºया १२ नेत्यांची यादीच तयार केली आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी पथके कार्यरत आहेत. १२ मध्ये सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी असून ६ लोकप्रतिनिधीही असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजते. या सर्वांचा रोजची रोज अहवाल वरिष्ठांकडे जात आहे.