निवडणूक प्रशिक्षणात वादळाचा धिंगाणा, सात जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:31 IST2019-04-08T00:30:49+5:302019-04-08T00:31:21+5:30
बीड लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण सुरु असताना अचानक वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळून सात प्रशिक्षणार्थी जखमी झाले.

निवडणूक प्रशिक्षणात वादळाचा धिंगाणा, सात जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : बीड लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण सुरु असताना अचानक वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळून सात प्रशिक्षणार्थी जखमी झाले. केज येथील वसंत महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवारी दुपारी ही घटना घडली. जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान अचानक निर्माण झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या घटनेवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यात आले असून कोणीही काळजी करू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन शोभा जाधव यांनी केले आहे
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया आणि घ्यावयाची काळजी याबाबत दुसऱ्या प्रशिक्षणासाठी रविवारी दोन हजार कर्मचारी सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण देण्यात येत होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाºयामुळे मंडपाचे लोखंडी पाईप व अॅँगल वाकले. मंडप पडल्याने तेथे बसलेले प्रशिक्षणार्थी कर्मचारी जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये पठाण उमेदा बेगम (वय ३८), स्नेहा हरिहर बर्दापुरे ,(३०) हुमेरा फिरोज शेख (४६), आस्मिन सुलतान समशोद्दीन (४०), सायरा शेख (४०) , खाजिया खिरा (५०) , शेख फातिमा तनवीर (सर्व रा. अंबाजोगाई) या सात महिला कर्मचा-यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी संदीप मोराळे सह आरोग्य कर्मचा-यांनी रुग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय व नंतर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले आहे. या मंडपाच्या सुरक्षिततेची तपासणी अथवा पाहणी केली नसल्याची बाब या घटनेमुळे समोर आली आहे.