Dhananjay Munde defeats BJP candidate, first Sarpanch elected in parli of mahavikas aghadi | भाजपा उमेदवाराचा पराभव, महाविकास आघाडीचा पहिला सरपंच मुंडेंच्या परळीत
भाजपा उमेदवाराचा पराभव, महाविकास आघाडीचा पहिला सरपंच मुंडेंच्या परळीत

बीड - राज्यातील सत्तास्थापनेच्या चढाओढीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला यश आले. त्यामुळेच, शिवसेनेला पाठिंबा देत राज्यात महाविकास आघाडी निर्माण झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे जनक शरद पवार यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली. राज्यात सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपा विरोधी पक्षात बसला. त्यामुळे राज्यस्तरावर महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. मात्र, स्थानिक स्वराज संस्थांमध्ये काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

स्थानिक स्वराज संस्थांमधील ग्रामपंयात निवडणुकींतून महाविकास आघाडीचा पहिला सरपंच निवडून आला आहे. आमदार धनंजय मुंडेंच्या मतदारसंघातील शिरसाळा ग्रामपंचायतीवर हा विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीच्या उमेदवार आश्रूबाई विश्वनाथ किरवले यांना पहिल्या सरपंचपदाचा मान मिळाला आहे. धनंजय मुंडेंनी याबाबत ट्विट करुन आश्रुबाईंचे अभिनंदन केले आहे. तसेच, परळी मतदारसंघातून महाविकास आघाडीचा पहिला सरपंच निवडून आल्याचा मला अभिमान आहे, असेही त्यांनी म्हटलंय. 
परळी तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या सिरसाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी काल रविवारी पोटनिवडणूक झाली. या निवडणूकीत धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने श्रीमती आश्रुबाई किरवले या उमेदवार म्हणून उभ्या होत्या. राज्यात नव्याने महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर त्याचा पहिलाच प्रयोग धनंजय मुंडेंनी सिरसाळा या आपल्या मतदारसंघात करताना तिन्ही पक्षांना एकत्रित करून एकच उमेदवार उभा केला. या उमेदवाराने भाजपा उमेदवार आशाबाई कपिल चोपडे यांचा 1395 मतांनी पराभव केला.

Web Title: Dhananjay Munde defeats BJP candidate, first Sarpanch elected in parli of mahavikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.