मोठी बातमी: बीड प्रकरणात सरकारची डोकेदुखी वाढली; फडणवीसांच्या विश्वासू आमदाराकडून आक्रमक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 16:26 IST2024-12-28T16:25:03+5:302024-12-28T16:26:45+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या अभिमन्यू पवार यांनी सरकारला घरचा आहेर देत इशारा दिला आहे.

Big news Governments headache in Beed case increases Aggressive warning from devendra Fadnavis trusted MLA abhimanyu pawar | मोठी बातमी: बीड प्रकरणात सरकारची डोकेदुखी वाढली; फडणवीसांच्या विश्वासू आमदाराकडून आक्रमक इशारा

मोठी बातमी: बीड प्रकरणात सरकारची डोकेदुखी वाढली; फडणवीसांच्या विश्वासू आमदाराकडून आक्रमक इशारा

Beed Sarpanch Murder Case ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, या मागणीसाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाशदादा सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, भाजप आमदार सुरेश धस, आमदार अभिमन्यू पवार, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती  असे सर्वपक्षीय नेतेमंडळी आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हेदेखील सहभागी झाले होते. या मोर्चातून दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. सरपंच हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपी आणि खंडणी प्रकरणात फरार असलेल्या वाल्मिक कराड याला तत्काळ अटक करण्यात यावी आणि या संपू्र्ण प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसंच यावेळी भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या अभिमन्यू पवार यांनी सरकारला घरचा आहेर देत इशारा दिला आहे.

 "ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांना मारलं गेलं, महाराष्ट्राच्या इतिहासात इतकी क्रूरता कधी ऐकायला, वाचायला मिळाली नव्हती, इतक्या क्रूरपणे त्यांना मारलं गेलं. तितक्याच क्रूरपणे आरोपींना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, हे तुम्हाला सांगायला आज आम्ही आलो आहोत. हा आक्रोश फक्त बीड जिल्ह्याचा नाही. हा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील जनतेचा आहे. मी सरकारमध्ये असलो तरी सरकारला सांगू इच्छितो की, या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक नाही झाली तर भविष्यात लातूर, जालना,  धाराशिव असं राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे निघतील. जसे कोपर्डी प्रकरणानंतर राज्यभर मोर्चे निघाले, तसे मोर्चे आताही निघतील, असा इशारा सरकारला मी यानिमित्ताने देत आहे," अशी आक्रमक भूमिका आमदार अभिमन्यू पवार यांनी मांडली आहे. 

"संतोष देशमुख यांना मी लातूर जिल्ह्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सगळे आमदार बीड जिल्ह्यातील जनतेसोबत आहोत. तुम्हाला माहीत असेल की, आम्ही विधानसभेत आवाज उठवला आहे, रस्त्यावरही आवाज उठवत आहोत, पुढेही रस्त्यावर येऊ, तुम्ही काही काळजी करू नका. हा मोर्चा कोणा पक्षाचा, जातीचा किंवा धर्माचा नाही, तर बीड जिल्ह्यातील आक्रोशित आणि पीडित जनतेचा मोर्चा आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी लातूरमधून बीडमध्ये या मोर्चासाठी आलो आहे. या हत्या प्रकरणातील आरोपी कोणीही असो, कितीही मोठा असो, वाल्मिक कराडही असो त्याला अटक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जर आरोपींना लवकरात लवकर अटक झाली नाही तर आम्ही लातूरमध्येही असा मोर्चा काढू, असं आश्वासन मी तुम्हाला देत आहे," असा शब्द यावेळी आमदार पवार यांनी बीड जिल्हावासीयांना दिला आहे.

Web Title: Big news Governments headache in Beed case increases Aggressive warning from devendra Fadnavis trusted MLA abhimanyu pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.