Beed Santosh Deshmukh: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ४ आरोपी अजूनही मोकाट; राजकीय दबावातून दिरंगाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 13:39 IST2024-12-14T13:38:55+5:302024-12-14T13:39:48+5:30

या प्रकरणात कोणत्या राजकीय नेत्याने पोलिसांनी दबाव टाकला आहे का, याचाही शोध घेण्याची मागणी आता जिल्ह्यातील नागरिकांकडून होऊ लागली आहे.

Beed Santosh Deshmukh 4 accused in Sarpanch murder case still absconding Delay due to political pressure | Beed Santosh Deshmukh: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ४ आरोपी अजूनही मोकाट; राजकीय दबावातून दिरंगाई?

Beed Santosh Deshmukh: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ४ आरोपी अजूनही मोकाट; राजकीय दबावातून दिरंगाई?

Santosh Deshmukh Murder Case ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यासह राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. नराधम आरोपींनी संतोष देशमुख यांच्या संपूर्ण शरीरावर मारहाण करत क्रूरपणे त्यांची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे या हत्या प्रकरणानंतर स्थानिक पोलिसांनी कारवाईत दिरंगाई केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचं निलंबन करण्यात आलं असून पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. तपासात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर ही कारवाई सुरू असताना या हत्या प्रकरणातील सातपैकी चार आरोपी अजूनही फरार असून राजकीय दबावामुळे त्यांचा शोध घेण्यास विलंब होत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

मस्साजोग गावाच्या हद्दीत असणाऱ्या एका पवनचक्की कंपनीच्या कार्यालयाबाहेर झालेल्या वादातून संतोष देशमुख यांची सोमवारी दुपारी निर्घृण हत्या करण्यात आली. ज्या पवनचक्की कंपनीच्या कार्यालयाबाहेर हा वाद झाला त्या कंपनीला २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या वाल्किम कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे याची वाल्मिक कराड यांच्यासोबत असलेली जवळीक बीड जिल्ह्यात चर्चिली जात आहे. या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातपैकी फरार असलेल्या इतर चार आरोपींना वाचवण्यासाठी पडद्याआडून कोणती राजकीय यंत्रणा कार्यरत आहे का, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.

पोलीस कोणाच्या दबावात काम करत होते?

बीड जिल्ह्यातील आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सोमवारी दुपारी ३ वाजता संतोष देशमुख यांचं घुले आणि इतर नराधमांनी अपहरण केल्यानंतर संतोष देशमुख यांचे आत्येभाऊ याबाबतची फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र पोलिसांनी तब्बल ३ तास अपहरणाची फिर्यादच नोंदवून घेतली नाही. शिवाय देशमुख यांच्या शोधासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. पोलिसांनी तात्काळ शोधाशोध केली असती तर संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता," असा आरोप आमदार धस यांनी केला आहे.

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यासह सातजणांचा सहभाग आढळला आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणत्या राजकीय नेत्याने पोलिसांनी दबाव टाकला आहे का, याचाही शोध घेण्याची मागणी आता जिल्ह्यातील नागरिकांकडून होऊ लागली आहे.

Web Title: Beed Santosh Deshmukh 4 accused in Sarpanch murder case still absconding Delay due to political pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.